१५ डब्यांच्या बदलापूर लोकलच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ; तीन वर्षांची प्रतीक्षा संपली, प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर

मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांची गेल्या तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, २० जुलैपासून बदलापूरपर्यंत १५ डब्यांची लोकल सेवा सुरू होणार आहे.
१५ डब्यांच्या बदलापूर लोकलच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ; तीन वर्षांची प्रतीक्षा संपली,  प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर
१५ डब्यांच्या बदलापूर लोकलच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ; तीन वर्षांची प्रतीक्षा संपली, प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांची गेल्या तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, २० जुलैपासून बदलापूरपर्यंत १५ डब्यांची लोकल सेवा सुरू होणार आहे. सोमवारी दुपारी ३.०३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूरच्या दिशेने पहिली १५ डब्यांची लोकल रवाना होणार असून, ती दुपारी ४.२१ वाजता बदलापूर स्थानकात पोहोचणार आहे. प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून केला जाणार आहे.

कल्याण-कर्जत मार्गावरील फलाट विस्तारासह आवश्यक विविध अभियांत्रिकी कामे पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेने बदलापूरपर्यंत १५ डब्यांची लोकल सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मध्य रेल्वेवर सध्या १५ डब्यांच्या २२ लोकल धावत असून, नव्या सेवेमुळे ही संख्या ३२ वर जाणार आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत मार्गावरील एकूण पाच लोकलचे रूपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईहून रात्री ११.०८ वाजता सुटणारी अंबरनाथ धीमी लोकल जलद करण्यात आली असून, तीदेखील १५ डब्यांची धावणार आहे.

या निर्णयामुळे बदलापूर ते कर्जत पट्ट्यातील प्रवाशांना गर्दीच्या समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, ही केवळ सुरुवात असून, प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आणखी १५ डब्यांच्या लोकलची आवश्यकता असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत बदलापूरहून मुंबईच्या दिशेने आणि सायंकाळी मुंबईहून बदलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत अधिकाधिक १५ डब्यांच्या लोकल चालविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. कार्यालयीन वेळेत लोकलमध्ये अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने, गर्दीच्या वेळेतील फेऱ्या वाढविणे अत्यावश्यक असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

दरम्यान, १५ डब्यांची लोकल सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.

भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर विविध निवेदने, पत्रव्यवहार आणि छायाचित्रे प्रसारित केली जात आहेत. या माध्यमातून १५ डब्यांच्या लोकलसाठी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निर्णय झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

फेऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबरच गर्दीचे आव्हान

विशेष म्हणजे, भाजपमधील अनेक स्थानिक नेतेही आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगत सोशल मीडियावर पोस्ट आणि छायाचित्रे प्रसारित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत होत असतानाच, त्याच्या राजकीय श्रेयासाठी सुरू झालेल्या चढाओढीचीही शहरात चर्चा रंगली आहे. आता १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबरच गर्दीच्या वेळेत पुरेशा फेऱ्या उपलब्ध करून देण्याचे आव्हान मध्य रेल्वेसमोर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या सेवेला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात कोणते निर्णय घेते, याकडे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि कर्जत परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in