उरणमधील १५ क्रशर प्लांट अद्यापही बंदच, शिवडी-न्हावा सागरी सेतूची कंट्रोल रूम धोक्यात; व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण

शिवडी-न्हावा सेतूच्या कंट्रोल रूमला धोकादायक ठरणाऱ्या एक किमी अंतरापर्यंतच्या उरण-पनवेल परिसरातील १५ दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट सुरू करण्यासाठी परवानगीच दिली नसल्याने मागील २३ दिवसांपासून बंदच आहेत.
उरणमधील १५ क्रशर प्लांट अद्यापही बंदच, शिवडी-न्हावा सागरी सेतूची कंट्रोल रूम धोक्यात; व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण

उरण : शिवडी-न्हावा सेतूच्या कंट्रोल रूमला धोकादायक ठरणाऱ्या एक किमी अंतरापर्यंतच्या उरण-पनवेल परिसरातील १५ दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट सुरू करण्यासाठी परवानगीच दिली नसल्याने मागील २३ दिवसांपासून बंदच आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरात सुमारे १५०हून अधिक दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवडी-न्हावा सेतूच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान ६ जानेवारीपासूनच दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट १५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही पनवेल-उरण परिसरातील १५ दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट परवानगीअभावी मागील महिनाभरापासून अद्यापही बंदच आहेत. प्लांमध्ये ब्लास्टींग केले जात नाही. दुसरीकडून दगड आणून मशीनमध्ये पिसळे जातात. त्यानंतर तयार ग्रीट, खडी बांधकाम व्यावसायिकांना विक्री केली जाते. नियमांचे योग्य प्रकारे पालन केले जात असल्याचा दावा

संबंधित व्यावसायिकांकडून केला जात आहे. मात्र त्यानंतरही व्यवसायच २३ दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्यामुळे मालक वर्गामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे सत्र सुरू असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

महसूल, वन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अधिकृत आणि अनधिकृत अशा पनवेलमधील ९८ तर उरण-जासई परिसरातील ११ दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांटचा त्यामध्ये समावेश आहे. परिसरातील सुरू असलेल्या या दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांटमुळे आकाशात प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट उठतात. यामुळे जेएनपीटी एनएच बी-४ राष्ट्रीय महामार्ग, महामार्गावरील विविध रस्ते आणि या रस्त्यावरील जासई, गव्हाण, उलवे, वहाळ, पारगाव, चिंचपाडा आदी गावे व या गावा दरम्यानपर्यतच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

हवेत पसरणाऱ्या धुळीने भरलेल्या या धुरळ्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट चालक नियमांचे पालन करीत नाहीत. त्याकडे अधिकारीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या गंभीर प्रश्नाबाबत जासई, वहाळ, उलवे ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्याही अनेक तक्रारी आहेत.

देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी-न्हावा सेतूला धोकादायक ठरू पाहणाऱ्या एक किमी अंतरापर्यंतच्या दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद करण्याची मागणी एमएमआरडीएकडून करण्यात आली होती. त्यामुळे उरण-जासई परिसरातील ११ आणि पनवेल परिसरातील ५ दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. याबाबत एमएमआरडीएशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.

- राहुल मुंडके (प्रांत अधिकारी, पनवेल)

सागरी सेतूचे कंट्रोल रूम उरण-पनवेल परिसरात आहे. या अत्याधुनिक कंट्रोल रूममधूनच शिवडी-न्हावा सेतूचे (अटल सेतू) सर्वच कामकाज चालते. मात्र शिवडी-न्हावा सेतूच्या कंट्रोल रूमच्या बाजूलाच असलेल्या उरण-पनवेल परिसरातील एक किमी अंतरापर्यंतच्या दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांटमुळे कंट्रोल रूमच्या कामावर परिणाम होत आहे. यामुळे परिसरातील एक किमी अंतरापर्यंतच्या दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स प्लांट बंद करण्याची मागणी याआधीच आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कंट्रोल रूमपासून किती किमी अंतरापर्यंत परवानगी देता येऊ शकते, याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय सुरू आहे.

- एम.पी.सिंग (एमएमआरडीएचे संबंधित विभागाचे अधिकारी)

logo
marathi.freepressjournal.in