
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण १६० किलो वॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती करणारी संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या मोहीली येथील जल शुद्धीकरण प्रकल्प व कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी १२०किलो वॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती करणारी संयंत्रे आस्थापित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या १५ इमारतींवर ०.४४ मेगा वाॅट क्षमतेची सौरऊर्जा संयत्रे आस्थापित असून प्रतवर्षी ६.३४ लाख सौरऊर्जा युनिटचे उत्पादन करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन २००७ पासून नवीन इमारतीवर सौरऊर्जा संयंत्रे उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. सौरऊर्जा संयंत्रे उभारल्यानंतरच विकासक यांना नवीन इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. सन २००७ ते २०१२ या कालावधीत १८३२ इमारतींवर १,१०,२२,५८५/- लिटर्स प्रती दिन क्षमतेच्या सौर उष्ण जल संयत्राची उभारणी विकासकाकडून करण्यात आली आहे. सौर उष्ण जल संयत्रामुळे महापालिका क्षेत्रातील इमारतीमधील गरम पाणी करण्यासाठी विजेचा भार कमी झाला असून दरवर्षी १८ कोटी पारंपरिक वीज युनिटची बचत होत असल्याचे दिसून येत आहे.
सन २०१२ पासून नगरविकास विभागाच्या युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील नवीन इमारतीवर सौरऊर्जा निर्मिती करणारी सौर संयंत्रे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सन २०१२ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १९४ नवीन इमारतीवर ३.५ मेगा वॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती करणारे सौर संयत्रे विकासकाकडून बसवून घेण्यात आलेली आहेत. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरवर्षी ५०.४० लाख सौरऊर्जा वीज युनिटची निर्मिती होणार आहे. या हरित ऊर्जा निर्मितीतून इमारतीसाठी आवश्यक उदवाहन, वॉटर पंप,पॅसेज लाईट,आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक विजेची गरज भागणार आहे.
महापालिकाआयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेच्या विद्युत विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीकडे पाठपुरावा करून शासन निधीतून खालील इमारतीवर सौरऊर्जा निर्मिती संयत्रे बसविण्यात आली आहेत. महानगरपालिका क्षेत्रात एकूण २६ प्रयोग करून सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
महापालिकेचा पैसा खर्च न करता शासन निधीतून उपरोक्त इमारतींवर ०.३९० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती संयत्रे आस्थापित करण्याचे प्रस्तावित असून त्यातून दरवर्षी ५.६२ लक्ष सौरऊर्जा निर्मिती होणार आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २१ उच्च दाब वीज जोडणी धारकांकडून ४.३ मेगावॅट व ८९१ लघु दाब वीज जोडणी धारकांकडून १४.०१ मेगावॅट अशी एकूण १८ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती संयंत्रे नेट मीटरींगद्वारे आस्थापित केल्याची व त्यातून प्रति वर्षी २.६० कोटी सौरऊर्जा युनिट निर्मिती होणार आहे.
- दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण कल्याण
दि. १४ ते २० डिसेंबर या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहात आकर्षक माहिती पत्रकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी ऊर्जा संवर्धन व सौरऊर्जा या बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. सौरऊर्जा ही हरीत उर्जा असून काळाची गरज आहे. सौरऊर्जा संयंत्रे आस्थापित करणाऱ्या नागरीकांना महापालिकेतर्फे दरवर्षी मालमत्ता करात १ टक्के सूट देण्यात येते. त्यासाठी नागरीकांनी सौरऊर्जा संयंत्रे कार्यान्वित असल्याचा दाखला दरवर्षी महापालिकेत सादर करावा लागतो.
- प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता