भिवंडी : एका भामट्याने भाडेतत्त्वावर रूम देण्याच्या नावाखाली ६ जणांकडून हेवी डिपॉझिट म्हणून १७ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर भाडेकरूंनी रूम न मिळाल्याने पैशांची मागणी केल्यावर भामट्याने सर्वांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी भामट्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम अहमद हसनैन शाह असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीमने फिर्यादी रेश्मा ईसराईल खान हिच्याकडून शांतीनगर हद्दीतील गैबीनगर येथील सुनी जामा मशिदीजवळ रूम भाड्याने देतो म्हणून हेवी डिपॉझिट २ लाख रुपये घेतले. तसेच अन्य ५ जणांकडून १५ लाख ५० हजार रुपये उकळले आहेत. मात्र वसीमने ६ जणांपैकी एकालाही भाड्याने रूम दिलेली नाही. वसीमच्या नावावर एकही फ्लॅट नसताना त्याने त्याच्या नावावर सर्व फ्लॅट असल्याचे भासवून ६ जणांकडून १७ लाख ५० रुपये घेऊन सर्वांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी रेश्मा खानच्या फिर्यादीवरून वसीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष तपासे करीत आहेत.