१७ गावे व ३० पाडे आजही पाणी पुरवठ्यापासून वंचित

खेडोपाड्यात पाणी पुरवठा करण्यासाठी याच कच्च्या रस्त्यांतून गाड्यांची ये जा सुरू असते.
१७ गावे व ३० पाडे आजही पाणी पुरवठ्यापासून वंचित
Published on

तालुक्यातील पाणी टंचाई निर्मुलनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात असतात. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात टॅंकरव्दारे पाणी पुरवठा केला जाते मात्र काही दिवसांपासून धोकादायक रस्त्यांमुळे टॅंकरची वाहतुक होत नसल्यामुळे ग्रामीण नागरिकांचा घसा पावसाळ्याच्या दिवसतही कोरडाच आहे. तालुक्यातील रस्ते खराब असल्यामुळे खेडोपाड्यामध्ये सुख सुविधा राबविण्यास अडचणी होत असल्यामुळे प्रशासनाच्या विकासकामांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी होत असली तरी सालाबादप्रमाणे १७ गावे व ३० पाडे टंचाईग्रस्त भागात आजही पाणी पुरवठा सुस्थितीत होत नाही आहे. या भागात टॅंकरच्या माध्यामातून पाणी पुरवठा होत असतो त्यासाठी मुरबाड पंचायत समिती कडून सुमारे सात टॅंकर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान जून महिना संपत आला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने भुगर्भातील पाण्याची पातळी देखिल खालावली आहे. घोटभर पाण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांची पायपीट सुरूच असतांना टॅंकरव्दारे पाणी मिळत असल्याने नागरिकांची अस्वस्थता दूर झाली होती, मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे ग्रामीण भागातील कच्चे रस्ते हे वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. खेडोपाड्यात पाणी पुरवठा करण्यासाठी याच कच्च्या रस्त्यांतून गाड्यांची ये जा सुरू असते.

पावसामुळे येथील रस्त्यांची फार बिकट अवस्था झाल्याने टॅंकर चालकांनी या मार्गाच्या बाहेरच गाड्या थांबविल्या आहेत. पाणी वाहतुक करतांना टॅंकर ठिकठिकाणी फसत असल्याने टॅंकर चालकांना पाणी पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याचे टॅंकर चालकांनी म्हटले आहे. खराब रस्त्यात फसलेला टॅंकर बाहेर काढण्यासाठी टॅंकर चालकांना हजारो रुपये मोजावे लागतात त्यामुळे टॅंकर चालकांनी पाणी पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविली आहे.

शासन आदिवासी भागातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत असले तरी प्रत्यक्षात मात्र ह्या सुख सुविधापांसून खेडोपाड्यातल नागरिक वंचितच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुरक्षित रस्त्याअभावी नागरिकांना घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने शासनाचे धोरणा बाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in