पालघर आगाराच्या खोडाळामार्गे जाणाऱ्या बसफेऱ्या बंद

वाडा खोडाळा व पुढे नाशिक साठी खोडाळा मार्गावरुन धावणाऱ्या बससेवा या आधीच अत्यल्प आहेत.आजमितीस वाडा आगाराची वाडा शिर्डी ही एकमेव बससेवा दुपारी ३-३० वाजेची सुरू आहे.
पालघर आगाराच्या खोडाळामार्गे जाणाऱ्या बसफेऱ्या बंद

दीपक गायकवाड / मोखाडा

पालघर आगाराच्या पालघर येथून खोडाळा मार्गे जाणाऱ्या पालघर औरंगाबाद व पालघर नंदुरबार या पूर्वापार सुरू असलेल्या २ बससेवा मनोर येथील नादूरुस्त पुलाचे कारण देत खोडाळा मार्गे ऐवजी जव्हारमार्गे पुढे वळविण्यात आलेल्या आहेत. त्यामूळे वाडामार्गे ग्रामीण आदिवासी दुर्गम पट्ट्यातून पुढे खोडाळा आणि त्यापूढील खेड्यापाड्यातील प्रवासी आबालवृद्धांचे प्रचंड हाल होत असून, येथील अवैध प्रवासी वाहनातून जीवावर उदार होऊन लटकत प्रवास करावा लागत आहे. त्यामूळे अवैध प्रवासी वाहतूकीची अक्षरशः चांदी झालेली आहे.

वाडा खोडाळा व पुढे नाशिक साठी खोडाळा मार्गावरुन धावणाऱ्या बससेवा या आधीच अत्यल्प आहेत.आजमितीस वाडा आगाराची वाडा शिर्डी ही एकमेव बससेवा दुपारी ३-३० वाजेची सुरू आहे. या भागातून पुढे नाशिक किंवा पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयीन त्याच बरोबर न्यायालयीन कामासाठी जाणाऱ्या चाकरमानी व इतर कास्तकार मंडळींचे हाल होत असून मिळेल त्या वाहनाने त्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

याबाबत पालघर आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता "आम्हाला नेमून दिलेल्या नियत मार्गाशिवाय इतर मार्गावरून बससेवा वळविता येत नाही." त्यामुळे वाडा येथून पुढे खोडाळा मार्गे औरंगाबाद व नंदुरबार येथे जाणाऱ्या बसफेऱ्या या जव्हार मोखाडा मार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.

- प्रशांत पानघडे, आगार प्रमुख, पालघर आगार

मनोर येथील नादुरुस्त पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात मनोर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे संपर्क साधला असता, अजून प्रत्यक्ष कामालाच सुरुवात झालेली नसल्याचे समजते; मात्र सदर कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल. तोपर्यंत हलकी वाहने या ठिकाणाहून मार्गस्थ होऊ शकतात.

- हेमंत भोईर, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मनोर

पालघर आगार व्यवस्थापनाने आमच्या भागातून जाणाऱ्या बससेवा विक्रमगड मार्गे खोडाळा कडे वाळवाव्यात अशी भूमिका प्रवासी हितवर्धक संघाने घेतली असून, तसा पत्रव्यवहार विभाग नियंत्रक पालघर यांना केला असून तुर्तास वाडा आगार व्यवस्थापनाने वाडा येथून खोडाळा मार्गे नाशिकसाठी दोन बससेवा सुरू करण्याची मागणी वाडा आगार प्रमुख यांच्याकडे एका विनंती पत्राद्वारे केली आहे.

- बाळासाहेब मुळे, अध्यक्ष, प्रवासी हितवर्धक संघ, खोडाळा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in