कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात २० पदे रिक्त ,आरोग्य सेवेवर ताण पडणार

कल्याण तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास आहे
कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात २० पदे रिक्त ,आरोग्य सेवेवर ताण पडणार

कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवकांची तब्बल २० पदे रिक्त असून केवळ १० सेवकांवर तालुक्याची आरोग्य सेवा सुरु आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पावसाळ्यात विविध साथींचे आजार डोकं वर काढणार अशा वेळी आरोग्य यंत्रणा कार्यक्षम व सतर्क असणे महत्त्वाचे असते. यासाठी आरोग्य यंत्रणेकडे रिक्त पदें भरलेले पुरेसे मनुष्यबळ व औषधसाठा असणे गरजेचे असताना ही पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर ताण पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास आहे. येथील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २२ ते २५ उपकेंद्रे आहेत. निळजे, दहागाव आणि खडवली अशा केंद्रावर आरोग्याचा डोलारा आहे. सुदैवाने गोवेली ग्रामीण रुग्णालय देखील असल्याने निदान प्राथमिक उपचार तरी मिळतात. मागील दोन वर्षे कल्याण तालुका कोरोनाने चांगलाच ढवळून काढला. म्हारळ, खोणी पलावा, खडवली, दहागाव आदी परिसरात कोरोनाचे प्रमाण वाढत होते. सुदैवाने जास्त हानी न होता तालुक्याने कोरोनावर मात केली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस आदींनी चांगले काम केले.

परंतु आता पुन्हा एकदा चौथ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यासह ग्रामीण भागात देखील रूग्ण वाढत आहे. अशातच पावसाळा सुरू झाला आहे. तालुक्यातील सांडपाणी, कचरा गटारे, आदीचा बोजवारा उडाला आहे. अनेक ग्रामपंचायतीने पावसाळ्यापुर्वीची कामे केलेली नाही. काहींनी नाल्यातील कचरा काठावर ठेवल्याने तो पुन्हा नाल्यात जाणार, कचरा टाकण्यासाठी डंम्पिंग नसल्याने नागिरकांची डोकेदुखी वाढली आहे. पाण्याचे डबके, कचरा दुर्गंधी, आदीमुळे मलेरिया, टायफॉईड, चिकनगुणीया, लेफ्टोस्पायरासिस, गँस्ट्रो, कावीळ असे विविध आजार पावसाळ्यात हमखास निर्माण होतात. कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागत मंजूर ३० पदापैकी केवळ १० पदेच भरलेली आहेत. यामध्ये दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंजूर १७, भरलेली ४ तर रिक्त १३, खडवली येथे ७, भरलेली ५, रिक्त २, निळजे येथे ६, भरलेली १ आणि रिक्त ५ अशी परिस्थिती असल्याने पावसाळ्यात कसे आजार रोखणार हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांना आजार होऊच नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सर्व ग्रामपंचायतींना पावसाळ्यापुर्वी करावयाच्या उपाययोजना बाबतीत पत्रे दिली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in