कर्जत आगारातील २२ गाड्यांना नवी झळाळी; बहुसंख्य गाड्या धावताहेत नैसर्गिक इंधनावर

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत या गाड्या नवीन रूप धारण करून आल्या आहेत. त्यात जुन्या लालपरी गाडीची चेसी वगळता अन्य सर्व बदल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे अगदी नव्या कोऱ्या एसटी गाड्या कर्जत आगारात रुजू झाल्या आहेत.
कर्जत आगारातील २२ गाड्यांना नवी झळाळी; बहुसंख्य गाड्या धावताहेत नैसर्गिक इंधनावर

कर्जत : कर्जत एसटी आगाराच्या माध्यमातून कर्जत आणि खालापूर तालुक्यात एसटी गाड्या चालविल्या जातात. जुन्या गाड्यांमुळे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कर्जत आगारातील २२ एसटी गाड्यांना नवीन झळाळी देण्यात आली असून, आणखी १५ गाड्या नवीन रूप धारण करण्याचा तयारीत आहेत. कर्जत आगारात आता बहुसंख्य गाड्या या नैसर्गिक इंधनावर चालविल्या जाऊ लागल्याने पैशाची देखील बचत होऊ लागली आहे.

कर्जत येथील राज्य परिवहन आगारातून कर्जत तालुक्यातील सर्व भागात आणि खालापूर तालुक्यातील गाड्यांचे नियोजन येथील स्थानकातून केले जाते. खोपोली स्थानकातून पनवेल, पेण, अलिबाग, पाली या मार्गावर गाड्या चालविल्या जातात. तर कर्जत आगारातून तालुक्या बाहेर अलिबाग, खोपोली, पेण, वाशी, मुरुड, पाली, ठाणे या मार्गावर गाड्या चालविल्या जातात. तालुक्यात कर्जत आणि नेरळ येथील स्थानकातून गाड्या सोडल्या जातात. कर्जत आगारात सध्या ३८ गाड्या असून, त्यातील एक गाडी वगळता अन्य सर्व ३७ गाड्या कार्यरत आहेत. शासनाने सर्व आगारामध्ये महानगर गॅस निगम कडून सीएनजी गॅस पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कर्जत येथे महानगर गॅस निगम कडून पंप सुरू झाला आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे डिझेल गाडी मधून सी एन जी इंधन मध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा कर्जत आगारातील २२ गाड्यांना झाला असून, त्या गाड्या नव्या रुपात सज्ज होऊन आगारात आल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत या गाड्या नवीन रूप धारण करून आल्या आहेत. त्यात जुन्या लालपरी गाडीची चेसी वगळता अन्य सर्व बदल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे अगदी नव्या कोऱ्या एसटी गाड्या कर्जत आगारात रुजू झाल्या आहेत. एकूण ३७ गाड्या या टप्प्या टप्प्याने कर्जत आगारात दाखल होणार असून, सहा गाड्या या नवीन गाड्या सारखे बदल करून कार्यरत झाल्या आहेत.

एक लिटर डिझेलमध्ये चार किलोमीटर गाडी चालत होती, तर ७२-७५ रुपये दराने सीएनजीचे एक किलोमधून तेवढाच प्रवास होऊ लागला असल्याने एसटीची आर्थिक बाजू सावरण्यास मदत होऊ लागली आहे.

- मानसी शेळके, आगार प्रमुख

मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी व्यवस्था

या नवीन गाड्यांमध्ये प्रवासी देखील आनंद व्यक्त करू लागले असून, या गाडयांमध्ये प्रवाशी वर्गाला सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक तसेच मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी व्यवस्था आहे. तसेच नवीन लूक देण्यात आल्याने प्रवासी देखील समाधान मानू लागले आहेत.

सीएनजीमुळे आर्थिक फायदा

गाड्या नैसर्गिक इंधनावर चालविल्या जाऊ लागल्याने महत्वाची बाब आर्थिक दृष्ट्या फायद्याची ठरत आहे. त्यात आगारामध्ये इंधन पंप सुरू झाल्याने डिझेल भरून घेण्यासाठी गाड्या तासभर पंपांवर उभ्या राहिलेल्या असायच्या. त्याचा वेळ देखील वाचला असून, सीएनजीमुळे राज्य परिवहनचा मोठा आर्थिक फायदा होऊ लागला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in