महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने शिक्षिकेला २३ लाखांचा गंडा

याप्रकरणी फसवणुकीला बळी पडलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने शिक्षिकेला २३ लाखांचा गंडा

भिवंडी : मुंबईतील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दोन जणांनी संगनमताने शिक्षिकेची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फसवणुकीला बळी पडलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर फसवणूक करणारे बंटी-बबली फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील सौदागर मोहल्ला येथे राहणारी शिक्षिका अफरोज अन्वर कुरेशी यांच्या मुलीला मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रवेश घ्यायचा होता.मात्र तिचे खूप प्रयत्न करूनही तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. प्रेरणा बनवारीलाल शर्मा आणि कबीर सरकार या दोघांनी आपसात संगनमताने प्रथम महिला शिक्षिकेचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिच्या मुलीला मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर प्रवेशाच्या नावाखाली या दोघांनी ३० ऑगस्ट २०२१ ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान वेळोवेळी महिलेला बनावट कागदपत्रे देवून तिच्याकडून रोख आणि बँक खात्यातून एकूण ३३ लाख रुपये घेतले; मात्र शिक्षिका अफरोजच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. यानंतर महिलेने तिचे पैसे परत मागितले असता, दोघांनीही १० लाख रुपये परत केले. तर उर्वरित २३ लाख रुपये मागितल्यावर दोघांनी मोबाईल बंद करून पोबारा केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in