
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात ‘डॉक्टर’ या सन्माननीय शब्दावरच काळी छाया पडली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करत उल्हासनगर महापालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. उल्हासनगर महापालिकेने बुधवारी तब्बल २६ डॉक्टरांची संशयित यादी जाहीर केली असून, त्यापैकी १८ जणांवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेकायदेशीर डॉक्टरांविरुद्ध उल्हासनगर महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, धडक मोहीम राबवत आरोग्य विभागाने १८ बोगस डॉक्टरांविरोधात थेट गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित संशयित डॉक्टरांविषयीही सखोल चौकशी सुरू आहे.
ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून उल्हासनगर महापालिकेला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर महापालिकेने २६ डॉक्टरांची यादी तपासणीस घेतली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आणि त्यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत अनेक डॉक्टरांनी कोणतीही वैध पदवी, परवाना किंवा नोंदणी नसतानाही खुलेआम रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले.
या कारवाईनंतर आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि कायदा यंत्रणा आता एकत्र येत बोगस डॉक्टरांविरोधात ठोस पावले उचलत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता पुढील टप्प्यात अधिक मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.
महापालिकेची ठोस कारवाई
२६ संशयित डॉक्टरांची यादी प्राप्त
३ डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत
४ डॉक्टरांचे क्लिनिक बंद असल्यामुळे तपासात अडचणी
१ डॉक्टर कडोंमपा हद्दीतील; कारवाई सुरू
प्रशासनाचा सजगतेचा इशारा
डॉक्टराची अधिकृत नोंदणी आणि परवाना तपासा
संशयास्पद डॉक्टर अथवा निकषाबाबत पालिकेला माहिती द्या
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांना उल्हासनगरमध्ये थारा नाही! ही केवळ सुरुवात आहे, अशा बेकायदेशीर डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई होईल. नागरिकांनीही जागरूक राहून अशा प्रकारांबद्दल तात्काळ प्रशासनाला कळवावे, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.
- मनीषा आव्हाळे, (आयुक्त, उल्हासनगर महापालिका)