अरविंद गुरव/पेण : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाटातील २९ गावे, ४३ वाड्यांना गेले कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शडापाडा पाणीपुरवठा योजनेच्या जवळील बोटावर मोजण्याइतकी गावे सोडल्यास उर्वरित सर्वच गावांना जानेवारीपासूनच टँकर आणि तलावांचे पाणी पिण्यासाठी व घरगुती कारणासाठी वापरावे लागत असल्यामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. याबाबत अनेकवेळा आंदोलन, उपोषण करून देखील प्रशासन निद्रावस्थेत असल्याची खंत नागरिकांना व्यक्त केली आहे.
हेटवणे ते शहापाडा व शहापाडा ते पेण खारेपाट या ठिकाणी जीवन प्राधिकरण विभागाकडून धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेला ३८ कोटी निधी मंजूर करण्यात आला. या योजनेच्या कामाला २०१७ ला सुरुवात झाली. ही योजना १० डिसेंबर २०१९ ला पूर्ण करायची होती, परंतु ही योजना प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. याबाबत निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली होती. त्यानंतर नवीन ठेकेदाराला २२ जुलै २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता, मात्र अजूनपर्यंत निधीअभावी ही योजना अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान खारेपाट विभागातील तरुण पिढी गावात पाणी नाही म्हणून पेण शहरात स्थलांतरित होत आहे. जर पाणी उपलब्ध असते तर स्वतःच्या जागेत टुमदार घरे बांधून ही मंडळी गावातच राहिली असती. पण फक्त आणि फक्त पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हे सर्व होत आहे.
सिंचन योजना कागदावर
मुंबई व त्या परिसरातील वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज गृहीत धरून हेटवणे धरणाची निर्मिती करण्यात आली. पेण, खालापूर, सुधागड या तीन तालुक्याचे भूभाग घेऊन, हे हेटवणे धरण बांधले आहे. मात्र त्यामध्ये पेण तालुक्यातील गावे प्रामुख्याने बाधित झाल्यामुळे पेण तालुक्यातील जनतेच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र येथील जनतेला सिंचनाचे गाजर दाखवून डावे, उजवे कालव्यांचे खोदकाम केले गेले परंतु आता ते बुजू लागले आहेत. खारेपाट विभागातील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर सिंचनाचे शिक्के आहेत. तरी सुद्धा सेझसाठी जमिनी का व कशा विकल्या गेल्या? हा प्रश्न आणि उत्तर मागेच राहते. मग सिंचनासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा, कालव्यासाठीच्या निधीचा वापर झाला तो कागदावरच का? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन हवेत!
हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील ५२ गावांमधील ४२६८ हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र सोळा वर्षे होऊन गेली तरी हे काम का पूर्ण होत नाही. याबाबत १४ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधी चर्चेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मान्यता प्रदान करण्याचे आश्वासन दिलेले आहे. यासाठी विभागीय स्तरावरून सदरचे आमरण उपोषण मागे घेण्यासाठी सूचना दिल्यानंतर हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले होते. मात्र अद्यापही येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरून गेले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची खोटी आश्वासने
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विरोधात ७ डिसेंबर रोजी खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्यात आले होते. सदर उपोषण १४ डिसेंबरपर्यंत सुरू होते. त्यावेळी एमजीपी, पेण पाणीपुरवठा अधिकारी कोठेकर यांनी लेखी पत्र देवून २५ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा वाशी येथील टाकीत सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत दोन महिने उलटूनही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या संदर्भात लेखी आश्वासन देऊनसुद्धा काम न झाल्याबाबत विचारणा केली असता मिळालेल्या उत्तरामुळे संतप्त ग्रामस्थांनी सदर कार्यालयात टाळे ठोकून अधिकाऱ्यासह स्वत:ला कोंडून घेतले असता पेण पोलीस ठाण्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.