एका आईच्या डोळ्यादेखत तिच्या तीन वर्षीय मुलाचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये घडली. आईसोबत बिस्कीट कंपनीत गेलेल्या आयुष चौहान या चिमुकल्याचा बिस्कीट बनवणाऱ्या मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण अंबरनाथमध्ये शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या ठाकुरपाडा परिसरात पुजा चौहान ही महिला आपल्या तीन वर्षीय मुलासोबत राहते. आर्थिक तंगीमुळे पूजाला राधे कृष्ण बेकर्स या कंपनीत कामगारांना डबे पुरवण्याचे काम करावे लागत होते. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे डब्बे देण्यासाठी कारखान्यात गेली. तिने आयुषला देखील सोबत नेले, कारण घरी त्याला सांभाळणारे कोणीही नव्हते. मात्र, पूजाला कल्पनाही नव्हती की या निर्णयामुळे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खद प्रसंग ओढवणार आहे.
कारखान्यातील वातावरण आणि बिस्कीटांचा मोह आयुषला अनावर झाला. आई डबे देत असताना, आयुष उत्साहाने खेळत बिस्कीट बनवणाऱ्या मशीनकडे धावला. याचवेळी, दुर्दैवाने मशीनच्या पट्टामध्ये अचानक आयुषचा गळा अडकला. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे आयुषचा गळा पट्ट्यात ओढला गेला आणि तो गंभीर जखमी झाला. कामगारांनी तात्काळ आयुषला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पूजावर आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले की, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने केवळ पूजाच नाही, तर संपूर्ण अंबरनाथमधील लोकांना हादरवून सोडले आहे.
या दुर्घटनेने अनेक सामाजिक आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कारखान्यांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही, हे या घटनेने स्पष्ट केले आहे. मुलांना अशा ठिकाणी नेण्याचे धोके किती मोठे असू शकतात, हे लक्षात घेता, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक नियमावलीची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याच्या बाबतीत पालक आणि कामगारांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा अशा हृदयद्रावक घटना टाळता येणार नाहीत.