ठाणे : कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे ३०० पेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेल्याने याचा मोठा परिणाम रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर झाला आहे. रुग्णालयात नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलल्या असून डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाह्यरुग्ण विभागावर देखील परिणाम झाला आहे. ३०० निवासी डॉक्टर संपावर असल्याने हा सर्व ताण रुग्णालयातील डॉक्टरांवर पडला असून यामुळे या डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारला आहे.
ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास ३०० निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. कठोर ॲक्ट आणला पाहीजे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर यांचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण वाढला आहे. निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. सध्या कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २१३० रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे. याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मन्युष्यबळ मिळत नसल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना रुग्णलाय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे.
नो सेफ्टी,नो ड्युटी...
कळवा हॉस्पिटलमधील ३०० पेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेले असून हे सर्व डॉक्टर संपावर ठाम आहेत. शुक्रवारी निवासी डॉक्टरांनी पुन्हा रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत नो सेफ्टी,नो ड्युटी असा नारा देखील देण्यात आला. तर जोपर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
डोंबिवलीतही निषेध व आंदोलन
डोंबिवली : आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे ९ ऑगस्ट रोजी एका पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या झाल्याची घटना घडली होती. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित करत आहे. डोंबिवलीतही इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांच्या सेवा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात त्वरित बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (डोंबिवली ) सांगितले.