
ठाणे : घाटकोपर होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील ३२ ओव्हरसाईज होर्डिंग्जला नोटीस बजावून हे होर्डिंग्ज तात्काळ दिलेल्या परवानगीप्रमाणे लावण्याचे आदेश दिले होते. मात्र होर्डिंग्ज एजन्सीने पालिकेची नोटीस गांभीर्याने न घेता होर्डिंग्जवरील केवळ पत्रे उतरवले आहे. मात्र परवानगीपेक्षा जास्त असलेले महाकाय होर्डिंग्ज अजूनही कायम असून ठाणेकरांवरील धोका अद्यापही टळलेला नाही.
घाटकोपरची दुर्घटना घडल्यानंतर ज्या २९४ होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास २०० होर्डिंगमालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले आहे. मात्र ओव्हरसाईज होर्डिंग शहरात तसेच असल्याने अशा ३२ होर्डिंग्जला महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीमध्ये महापालिकेने ज्या साईजपर्यंत होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिली आहे, त्याच साईजचे करण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या. यामध्ये एमएसआरडीसी, रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या क्षेत्रात असलेल्या होर्डिंग्जची साईज कमी करण्यासंदर्भात देखील पत्र दिले होते. एमएसआरडीसीच्या हद्दीत १८, एसटी महामंडळाच्या हद्दीत २ तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत १ होर्डिंग असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरात विनापरवाना असलेले ओव्हरसाईज होर्डिंग तसेच असल्याचे समोर आले आहे. नोटीस बजावलेल्या एकही होर्डिंग्ज एजन्सीने त्यांच्या होर्डिंग्जची साईज कमी केलेली नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात होर्डिंग्जमुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हलणारे होर्डिंग्ज काढायला सुरुवात
फ्लॉवर व्हॅली जवळील धोकादायक होर्डिंग मंगळवारी संध्याकाळी उशिरा संबंधित एजन्सीकडून काढण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत होर्डिंग्जचे पत्रे काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे महाकाय होर्डिंग हलत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन होर्डिंगची पाहणी केली होती. त्यानंतर तात्काळ हे होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले होते. आता या होर्डिंगसंदर्भात महापालिका स्तरावर चौकशी सुरू असून त्यानंतरच सर्व सत्य बाहेर पडणार आहे.