रिलायन्स जिओच्या नावे ३५ हजार रुपयाचा गंडा; सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ

कोरोना काळापासून सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत असताना या गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलीस हतबल असल्याचे दिसत आहे
रिलायन्स जिओच्या नावे ३५ हजार रुपयाचा गंडा; सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ

रिलायन्स जिओच्या कस्टमर केअर विभागातून बोलतोय, तुमच्या मोबाइल नंबरची मुदत लगेच संपणार असून त्यासाठी तत्काळ रिचार्ज करावा लागणार आहे. आम्ही जी कंपनीचा अॅप पाठवतोय तो ओपन करून माहिती भरल्यास तुमच्या मोबाइल क्रमांकाची मुदत वाढेल अशी माहिती देत सायबर भामट्याने कळव्यात रहाणाऱ्या प्रशांत खरात या ग्राहकाच्या दोन बँक खात्यातून सुमारे ३५ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे पैसे युपीआयवरून रिलायसन जिओ खात्यात वळते झाले असल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसत आहे. दरम्यान कोरोना काळापासून सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत असताना या गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलीस हतबल असल्याचे दिसत आहे.

कळव्यात रहाणारे प्रशांत खरात दिवा हायस्कुल दिवा या ठिकाणी कामाला आहेत, बुधवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांना रिलायन्स जिओ कस्टमर केअर या नावाने एक फोन आला, समोरच्या व्यक्तीने आपण जिओ कस्टमर केअरमधून बोलत असून तुमच्या जिओच्या मोबाइलची मुदत संपत आली आहे तुम्ही तत्काळ रिचार्ज केला नाही तर तुमचा मोबाइल नंबर बंद होऊ शकतो. मात्र हे रिचार्ज तुम्हाला आमच्या अॅपमधून करावे लागेल त्यासाठी आम्ही लिंकमधून अॅप डाउनलोड करावे लागेल, थेट मोबाइल कंपनीतून फोन आला असल्याचे दिसत असल्याने आणि आपला मोबाइल क्रमांक बंद होऊ शकतो या भीतीने त्यांनी दिलेल्या लिंकवरून अॅप डाउनलोड केले आणि त्यात माहिती भरली मात्र त्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या दोन बँक खात्यातून सुमारे ३५ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे मेसेज आल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान त्यांनी तात्काळ बँकेत कळवले आणि पोलिसांची संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली.

दरम्यान याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता अशा फसवणुकीत गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच हे गुन्हे परराज्यातून तसेच परदेशातून करण्यात येत असल्याने या सायबरी गुन्हेगारी टोळ्याचा शोध घेणे अवघड जात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सायबर गुन्हेगार फसवणुकीचे निरनिराळे फंडे शोधत असून लोकांना फसवत आहेत. आता तर थेट यासाठी रिलायन्स जिओ या प्रख्यात मोबाइल कंपनीचे नाव वापरण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in