ठाण्यात चार महिन्यांमध्ये हिट अँड रनचे ३६ बळी; १५९ गुन्हे दाखल, २६ अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश

पुण्यात अल्पवयीन मुलाने नशेबाजी करून हिट अँड रनमध्ये दोन तरुणांचा बळी घेतल्याच्या घटनेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही नशेबाजांनी हिट अँड रन प्रकरणात अवघ्या चार महिन्यांत ३६ जणांचे बळी घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
ठाण्यात चार महिन्यांमध्ये हिट अँड रनचे ३६ बळी; १५९ गुन्हे दाखल, २६ अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अतुल जाधव /ठाणे

पुण्यात अल्पवयीन मुलाने नशेबाजी करून हिट अँड रनमध्ये दोन तरुणांचा बळी घेतल्याच्या घटनेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही नशेबाजांनी हिट अँड रन प्रकरणात अवघ्या चार महिन्यांत ३६ जणांचे बळी घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडे जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत हिट अँड रनचे तब्बल १५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३६ जणांचा मृत्यू तर १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. ठाणे हा नशेखोरांचा अड्डा बनला असून येऊर, हिरानंदानी मिडोज, उपवन, कोठारी कंपाऊंडमध्ये सुरू असलेल्या पब हुक्का पार्लरमध्ये दररोज नशेचा बाजार भरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. या प्रकारांनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात देखील ‘रॅश ड्रायव्हिंग, हिट अँड रन’ सारख्या घटनांचा आलेख वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. १ जानेवारी ते २४ एप्रिल दरम्यान हिट अँड रनच्या २३ घटना ठाण्यात घडल्या आहेत. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४५ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये २६ अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश आहे. तर वाहन परवाना नसताना गाडी चालवणाऱ्या २९५ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील येऊर, हिरानंदानी मिडोज, उपवन, कोठारी कंपाऊंड येथे अनधिकृत पब, बार, हुक्का पार्लरचे पेव फुटले आहे. पब, हुक्का पार्लरच्या संस्कृतीत नवीन पिढी करिअरचा ध्यास घेण्याऐवजी मौजमज्जा, मस्तीमध्ये हरवत चालली असल्याचे भयानक वास्तव यानिमित्ताने समोर आल्याचे पहायला मिळत आहे. वास्तविक पाहता या घटना ठाण्यासाठी नवीन नाहीत मात्र पुण्याच्या घटनेननंतर आता त्यांची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. या घटनेननंतर ठाण्यातील सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

१ जानेवारी ते २४ एप्रिल दरम्यान घटना

- हिट अँड रनच्या घटना - २३

- हिट अँड रन बळी - ३६

- हिट अँड रन जखमी - १०६

- ड्रिंक अँड ड्राइव्ह - १०४५

- अल्पवयीन चालक कारवाई - २६

- विनापरवाना चालक कारवाई - २९५

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असते. दारू पिऊन गाडी चालू नका, असे आवाहन आमच्याकडून नेहमीच केले जाते. कुठेही अपघात होऊ नये, यासाठी आम्ही जेवढी काळजी घेतो, तेवढीच नागरिकांनी आणि मुलांच्या पालकांनी देखील घेणे गरजेचे आहे. - डॉ. विनायकुमार राठोड, उपायुक्त, वाहतूक शाखा ठाणे

ठाण्यातील अनधिकृत पब, हुक्का पार्लर याबाबत विधानसभेत प्रश्न देखील मांडले. गेली दोन वर्ष हुक्का पार्लर, पबमुक्त ठाणे ही मोहीम सुद्धा राबवली मात्र पोलिसांचेच पब आणि हुक्का पार्लर चालकांशी लागेबंदे असल्याने मोहीम १००% पूर्ण होऊ शकत नाही. - संजय केळकर, आमदार, भाजप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या येऊरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल्स, दारू पार्ट्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. रात्री अकरा वाजेपर्यंत हे सर्व हॉटेल्स बंद व्हावी, असे शासनाचे आदेश असतानाही ती रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, इथे जीवाला काहीच महत्त्व नाही, फक्त पैसा महत्त्वाचा आहे. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

ठाणे शहरातील सर्व पब आणि हुक्का पार्लर हे उच्चभ्रू भागात असून दारूच्या नशेत या ठिकाणी अनेकदा अपघात घडत असतात. हिट अँड रनचे प्रकार देखील अनेक वेळा या ठिकाणी घडले आहेत. खरंतर पोलिसांचा आणि स्थानिक राजकीय नेत्यांचे या पब आणि हुक्का पार्लरचालकांना पाठबळ आहे. त्यामुळे यांना कसलीच भीती नसल्याने सर्रासपणे या ठिकाणी सकाळपर्यंत हे सर्व धंदे सुरू असतात. - स्वप्निल महिंद्रकर, सामाजिक कार्यकर्ते

पुणे प्रकरणानंतर राज्यभर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी ठाण्यातील अनधिकृत पब आणि हुक्का पार्लरवर कारवाई करावी आणि पुण्यासारखी घटना ठाण्यामध्ये घडू नये, याची काळजी घ्यावी. - आनंद परांजपे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

logo
marathi.freepressjournal.in