वसई : आगरी समाज विकास मंडळ, वसई तालुक्याचे ३९वे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षिस समारंभ व सांस्कृतिक आणि कला क्रीडा महोत्सव रविवार, १४ जानेवारी रोजी, डॉ. दि. ज. गाळवणकर स्मारक विद्यामंदिर, अर्नाळा येथे बोईसरचे आमदार राजेश पाटील, आगरी समाजाचे भूषण पोलीस आयुक्त, रेल्वे डॉ. रवींद्र अ. शिसवे, अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार घरत, आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा वसई-विरार शहर मनपाचे माजी महापौर नारायण मानकर, तसेच आरनाळा शेतकरी सोसायटीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
समारंभात मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाटील यांनी समाज व्यवस्थेत काम करताना समाजाच्या गरजा काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले. आपण समाजाचे कसे देणं लागतो आणि समाजाचे उतराई कसे होता येईल? याचे भान ठेवून सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. आगरी समाज मंदिरासाठी जागा मिळवणेसाठी सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक असून, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.
यंदा हे स्नेहसंमेलन साजरे करण्याचा मान अर्नाळा दक्षिण विभागाला मिळाला होता. सकाळच्या सत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले होते. दुपारच्या सत्रात झालेल्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस समारंभ कार्यक्रमात अर्नाळा दक्षिण विभागातील १००पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा तसेच सन २०२२-२३ मध्ये आगरी समाज विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये पी.एच.डी., डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, विविध पदवी व पदविका प्राप्त विद्यार्थी, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कला-क्रीडापटूंचा तसेच इ. १ ली ते १०, तसेच १२वी व पदवीधर अशा एकूण ३५०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.