
जव्हार तालुक्यापासून २५ ते ३० किमी अंतरावर पिंपळशेत ग्रामपंचायतीमधील २०० लोकवस्ती असलेल्या ३५ घरांचा हुंबरन हा आदिवासी पाडा विकासापासून अजूनही नॉट रीचेबल आहे. या भागातील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी ४ किमीचा मोठा डोंगर पार करून जावे लागत आहे. शिवाय एवढी पायपीट करूनही छोट्या खड्ड्यातून पेल्याने दूषित पाणी भरून तेच प्यावे लागत आहे.
या गावातील महिलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी पायपीट करण्यात जातो. शासनाने रस्ता, आरोग्य आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
याबाबत जव्हार तहसीलदार आशा तमखाडे यांच्याशी संपर्क साधला असता, हुंबरन गावाला रस्ता नाही, त्यामुळे टँकर जाण्यास अडचण आहे, गटविकास अधिकारी यांना या बाबत माहिती दिली असून त्यावर उपायोजना होऊ शकतील. असे त्यांनी सांगितले. आदिवासी पाड्यावरील नागरिक अजूनही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. आदिवासी बांधवांचे प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेण्यासाठी विरोधक व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी जव्हार, मोखाड्याच्या संवेदनशील भागात फिरावे, समस्या पाहाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.