बनावट दागिने गहाण ठेवून अभ्युदय बँकेला ४३ लाख ६७ हजारांचा गंडा

बँकेत बनावट सोने गहाण ठेवून ही रक्कम उकळली आहे. त्यानंतर बँकेत बनावट सोने ठेवणारी टिना दडवेने कर्जाची घेतलेली रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
बनावट दागिने गहाण ठेवून अभ्युदय बँकेला ४३ लाख ६७ हजारांचा गंडा

उरण : न्हावा-शेवा येथील अभ्युदय बँकेत सोन्याचे बनावट दागिने गहाण ठेवून ४३ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात टिना राज दडवे, नितेश उत्तमराव गव्हाणे आणि सोने तपासणी करणारा सुवर्णकार राजेंद्र वसंत काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी वेळोवेळी बँकेत बनावट सोने गहाण ठेवून ही रक्कम उकळली आहे. त्यानंतर बँकेत बनावट सोने ठेवणारी टिना दडवेने कर्जाची घेतलेली रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

घटनेनुसार टिना दडवे या महिलेने बँकेकडे सुरुवातीला जानेवारी २०२२ मध्ये सोन्याच्या दागिन्यांवर बोटीच्या व्यवसायासाठी सोने तारण कर्ज देण्याची मागणी केली. त्यानंतर बँकेच्या पॅनेलवरील सोन्याचे मूल्यांकन करणारे व्हॅल्युअर राजेंद्र काळे रा. चिरनेर यांच्याकडे या सोन्याची तपासणी करण्यासाठी पाठवले असता त्यांनी त्या सोन्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट दिला. त्या आधारे बँकेने टिना दडवे यांना ९ लाख ५० हजार सोने तारण कर्ज दिले. त्यानंतर त्यांनी आणखी तीन वेळा आणि ड्रायव्हर नितेश उत्तमराव गव्हाणे यांच्या नावावर बनावट सोन्याच्या दागिन्यांवर एकूण ४३ लाख ६७ हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर या सोनेतारण कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे हे खाते एनपीएमध्ये गेले आणि बँकेने अखेर सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करून कर्ज वसूल करण्याच ठरले.

बँकेने मशीनद्वारे सोन्याची तपासणी केली असता या सोन्यांच्या दागिन्यांना वरून सोन्याचा मुलामा दिलेला व आतून चांदी भरलेली असल्याचे आढळले. त्यानंतर बँकेने टिना दडवे, नितेश गव्हाणे आणि राजेंद्र वसंत काळे यांनी आपसात संगनमत करून त्यांचे जवळचे बनावट सोने बँकेत तारण ठेवून त्यावर ४३ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पैशाचा अपहार केला आणि बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in