तीन महिन्यांच्या कालावधीत ४८ जणांच्या आत्महत्या; ठाणे महसूल उपविभागातील आत्महत्यांच्या घटना चिंताजनक

गळफास घेणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वयोगटातील संख्या सर्वाधिक आहे. दिवसेंदिवस तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनेने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत ४८ जणांच्या आत्महत्या; ठाणे महसूल उपविभागातील आत्महत्यांच्या घटना चिंताजनक

ठाणे : ठाणे उपविभागाचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे उपविभाग या कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत १४४ जणांचा आकस्मिक झाला असून, यामध्ये आत्महत्यांच्या घटनांत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तीन महिन्यांत ४८ जणांनी आत्महत्या केलेल्या असून, पैकी २३ जणांनी गळफास घेतला आहे. विशेष म्हणजे, गळफास घेणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वयोगटातील संख्या सर्वाधिक आहे. दिवसेंदिवस तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनेने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत एकूण १४४ अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे, असे नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

ठाणे महसूल उपविभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या विविध घटनांमध्ये अनैसर्गिक मृत्यूच्या घटनाही वाढल्या असून, ६८ जणांची नोंद करण्यात आली आहे तर १९ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दरम्यान, आत्महत्यांच्या घटनांमध्ये होणारी बाब चिंतनीय असून, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण, बेरोजगारी अशा कारणांतून या आत्महत्यांच्या घटना घडल्या असून, तणावात असलेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी कार्यशाळा घेणे आवश्यक आहे, तर वैद्यकीय स्तरावर अशा व्यक्तींचे कौन्सिलिंग करून त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in