
ठाणे : करमुसे प्रकरणात पोलिसांनी नव्याने चौकशी करून न्यायालयाच्या निर्देशानुसार ९० दिवसांपूर्वीच ५०० पानांचे चार्जशीट दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे. कासारवडवली परिसरात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांना तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप असल्याने वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते, तर करमुसे यांचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही उच्च न्यायालयाने नमूद केले होते.
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर करमुसे यांना आमदाराने मारहाण केल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर फेर चौकशीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सदर प्रकरणाची सखोल फेर चौकशी करून निर्देशानंतर ९० दिवसाच्या आत न्यायालयात करमुसे प्रकरणाची चार्जशीट दाखल करावी. याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करीत ठाणे पोलिसांनी या प्रकरणात तब्बल ५०० पानाचे चार्जशीट दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे.
नव्याने तपास करण्याचे न्यायालयाचा होता आदेश
हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करून नव्याने तपास करण्यात यावा, अशी याचिका करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. याची दखल घेत पोलिसांना या प्रकरणाचा तपास नव्याने करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, पोलिसांनी चौकशी करून न्यायालयाच्या निर्देशानुसार ९० दिवसांपूर्वीच ५०० पानांचे चार्जशीट न्यायालयात दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे; मात्र या संदर्भात पोलीस काहीही सांगायला तयार नाहीत.