पालघरमध्ये वर्षभरात क्षयरोगाचे ५४ बळी: २९४९ रुग्णांची अजूनही झुंज सुरू; आरोग्य विभाग अपयशी

क्षयरोग रुग्णांना सकस आहार मिळावा म्हणून शासनाच्या निक्षय पोषण आहार योजनेतून दरमहा ५०० व अधिक ५०९ रुपयांचे अनुदान क्षय रुग्णांना देण्यात येते
पालघरमध्ये वर्षभरात क्षयरोगाचे ५४ बळी: २९४९ रुग्णांची अजूनही झुंज सुरू; आरोग्य विभाग अपयशी

संतोष पाटील/वाडा : पालघर जिल्ह्यात क्षयरोगाने वर्षभरात ५४ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात २९४९ रुग्ण अजूनही क्षयरोगशी झुंज देत आहेत. विशेषतः विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान केलेल्या तपासणीत १९७४ संशयित रुग्ण आढळले आहेत. पालघर व डहाणू तालुक्यात क्षयरुग्णांची संख्या कमालीची दिसून येते. क्षयरोग रुग्ण औषधोपचार घेण्यात काचकूच करत असल्यामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याचे कारण समोर आले आहे; मात्र आरोग्य विभाग यावर लक्ष देण्यात अपयशी ठरत असल्याचे मृत्यूच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

क्षयरोग रुग्णांना सकस आहार मिळावा म्हणून शासनाच्या निक्षय पोषण आहार योजनेतून दरमहा ५०० व अधिक ५०९ रुपयांचे अनुदान क्षय रुग्णांना देण्यात येते; मात्र ही योजना सर्व रुग्णांपर्यंत पोचली नसल्याची बोंब आहे. क्षयरोगासाठी सरकारी दवाखान्यांमध्ये एक्स रेची सोय केली गेली असली तरी काही ठिकाणी एक्स रे यंत्र बंद आहेत, तर काही ठिकाणी एक्स रे टेक्निशियन उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी सेंटरकडे जावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.

अनेक ठिकाणी क्षय तपासणी केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली असली तरी वेळखाऊ प्रक्रियेमुळे रुग्ण या केंद्राकडे जात नाहीत. क्षयरोग निर्मूलनासाठी सरकारकडे बक्कळ निधी उपलब्ध असला, तरी सामाजिक उत्तरदायित्व व दाते शोधून या रोगासाठी प्रशासनाकडून मदत का घेतली जात आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी

पालघर जिल्ह्यात वैद्यकीय चाचणी दरम्यान जिल्ह्यात ७७ हजार रुग्णांपैकी सुमारे ३४ हजार रुग्णांची क्षय रोगासाठी तपासणी करण्यात आली होती. प्राथमिक तपासणीमध्ये १९७४ रुग्णांची विस्तृत तपासणी सुरू असून, १४० रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ४९ रूग्णांना औषधाला प्रतिरोधक (ड्रग रेजिस्टंट) क्षयरोग व औषधाला प्रतिसाद देणाऱ्या (ड्रग सेन्सिटिव्ह) २९०० रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. क्षयरोगाची वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

क्षेत्र औषध औषध एकूण

प्रतिसाद प्रतिरोधक

बोईसर ४४१ ७ ४४८

डहाणू ५४४ १२ ५५६

जव्हार २८३ ६ २८९

मोखाडा १६२ ० १६२

पालघर ५३० १९ ५४९

तलासरी १६२ १ १६३

वसई ग्रामीण २७२ ४ २७६

विक्रमगड २५२ ० २५२

वाडा २५४ ० २५४

एकूण २९०० ४९ २९४९

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in