वर्षभरात ५४० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, पुरुषांचा प्रतिसाद अल्प

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा जव्हार तालुका शिक्षण, आरोग्य विभाग तथा केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांमुळे विकसित होत आहे.
वर्षभरात ५४० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, पुरुषांचा प्रतिसाद अल्प

जव्हार : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा जव्हार तालुका शिक्षण, आरोग्य विभाग तथा केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांमुळे विकसित होत आहे. लहान कुटुंब, सुखी कुटुंब या ब्रीद वाक्याचा बोध घेत येथील नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला प्राधान्य दिले आहे, गेल्या वर्षभरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे एकूण उद्दिष्ट ४८५ असताना ते तालुका आरोग्य विभागाने सहज पूर्ण करून त्यापेक्षा अधिक म्हणजे ५४० शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. यापैकी स्त्री शस्त्रक्रिया ५२१ करण्यात आल्या असून, त्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रिया १९ असल्याने पुरुषांच्या सहभागाचे अल्प प्रमाण आहे; मात्र ग्रामीण भागात पुरुष देखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी हळूहळू का होईना पुढाकार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. त्यामुळेच आरोग्य विभागाकडून 'हम दो हमारे दो'चा जागर करीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाते. मात्र या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण असून, तालुक्यात गेल्या वर्षभरात महिलांच्या तुलनेत केवळ १९ पुरुषांनी शस्त्रक्रिया केली आहे, यावरून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत महिलाच पुढे असल्याचे दिसून येते.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने कुठलेही विपरीत परिणाम पुरुषाच्या शरीरावर होत नसल्याचे आरोग्ययंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. शिवाय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वैवाहिक जीवनाचा आनंद घेणाऱ्या पुरुष किंवा महिलेला करता येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे पुरुषाच्या शरीरावर कुठलेही विपरीत परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असले तरी मागील वर्षभरात पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पाठ दाखवली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया फायद्याची असली तरी समाजात अनेक गैरसमज कायम आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. नसबंदी केल्याने पुरुषत्व जाण्याच्या भीतीने पुरुष मंडळी शस्त्रक्रियेला तयार होत नाही. ज्यामुळे महिलांनाच शस्त्रक्रियेसाठी पुढे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे पुरुषाच्या शरीरावर कुठलेही विपरीत परिणाम होत नाही. याबाबत नेहमीच जनजागृती करण्यात येते. मात्र असे असले, तरी मागील वर्षभरात पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पाठ दाखवली आहे. पुरुषांनी न घाबरता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे येण्याची गरज आहे.- डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार

logo
marathi.freepressjournal.in