मुंबई विद्यापीठ आयोजित विद्यार्थी विकास विभाग ५५ व्या युवक महोत्सवाच्या विभागीय स्पर्धेत मोखाडा महाविद्यालयाची गरुडझेप

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी म्हणुन दरवर्षी मुंबई विद्यापिठातर्फे युवा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा ५५ वा युवा महोत्सव होता
मुंबई विद्यापीठ आयोजित विद्यार्थी विकास विभाग ५५ व्या युवक महोत्सवाच्या विभागीय स्पर्धेत मोखाडा महाविद्यालयाची गरुडझेप

जव्हार: शांतारामभाऊ घोलप आर्ट्स, सायन्स आणि गोटीरामभाऊ पवार कॉमर्स कॉलेज शिवळे ता. मुरबाड जि. ठाणे येथे नुकताच मुंबई विद्यापीठ अंतर्गत ५५ वा विभागिय 'युवा महोत्सव' पार पडला. यात वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मोखाडा महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी तब्बल सहा पारितोषिके पटकावुन घवघवीत यश संपादन करीत महाविद्यालयाचे नाव लौकिक केले.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी म्हणुन दरवर्षी मुंबई विद्यापिठातर्फे युवा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा ५५ वा युवा महोत्सव होता. यावेळी ठाणे व पालघर विभागाचे आयोजन मुरबाड येथील शिवळे महाविद्यालयात केले होते. जवळपास या दोन्ही जिल्ह्यांतील विस पेक्षाही अधिक महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. यात पालघर जिल्ह्यातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल मोखाडा सुद्धा सहभागी होते. मोखाडा महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव गवारी (कोलाज, टाकाऊ कागदापासुन चित्र काढणे) प्रथम क्रमांक, तारपा लोकनृत्य द्वितीय क्रमांक, मितल वारघडे स्टोरी टेलिंग (कथा कथन) द्वितीय क्रमांक, सुनैना जाधव (मेहंदी) तृतीय क्रमांक, कुणाल गोडे (कथा लिखान) तसेच देवराज बारात याने (पोस्टर मेकिंग, भित्तीपत्रिका) या प्रकारात उत्तेजनार्थ कामगिरी केली. या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. म्हणुन सर्व विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व ही विध्यार्थ्यांपैकी देवराज बारात हा हाताने दिव्यांग असुन देखील त्याने अतिशय सुरेख फलक रेखाटुन उपस्थित प्रेक्षक, मान्यवर, व स्पर्धक यांना हेल्मेट वापरणे संबंधी उत्तम संदेश दिला. त्याच्या या अद्वितीय कलेबद्दल युवा महोत्सव परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले. त्याचे मनोबल वाढावे यास्तव त्याला 'उत्तेजनार्थ' प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या अभुतपूर्व यशाबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी भरभरून कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वाय. एच उलवेकर, डॉ. संतोष जाधव, प्रा. आर. डी. घाटाळ, प्रा. एस. वाय. तायडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे महत्वाचे योगदान राहिले. या विद्यार्थ्यांना तारपा नृत्य बसविताना धवळ्या पवार व रघुनाथ भोये यांनी उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून अतिशय महत्वाची भूमिका बजावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in