
भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील येडू कंपाऊंड परिसरात आजीकडे आलेल्या एका सहावर्षीय मुलाचा पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काशिमीरा येथून उत्तन येथे आपल्या आजीकडे राहण्यासाठी किरण हर्षद कॉलर (६) हा आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेलला किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे त्याची आई शोध घेत होती. यावेळी घराजवळील एका डबक्याच्या शेजारी त्याची चप्पल पडल्याचे दिसून आले, त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय झाल्याने कुटुंबीयांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाने डबक्यात शोध मोहीम राबवली असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याबाबतची माहिती उत्तन पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी दिली आहे.
महिन्याभरात दुसरी घटना
मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून महिन्याभरात दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या समोर आले. यापूर्वी २२ जून रोजी पेणकर पाडा भागातील पालिकेच्या कचरा प्रकल्प भागातील खड्ड्यात बुडून श्रीयांश मोनू सोनी (५) या मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील खड्ड्यांच्या सुरक्षेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.