७२ लाख २९ हजार ३३९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; यंत्रणा सज्ज, १० हजार ९३५ पोलीस, २४ केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बुधवारी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. जिल्हा प्रशासनासोबत पोलीस यंत्रणा देखील या लोकशीहीच्या उत्सवासाठी सज्ज झाली आहे.
७२ लाख २९ हजार ३३९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; यंत्रणा सज्ज, १० हजार ९३५ पोलीस, २४ केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात
Published on

ठाणे : विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बुधवारी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. जिल्हा प्रशासनासोबत पोलीस यंत्रणा देखील या लोकशीहीच्या उत्सवासाठी सज्ज झाली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याचबरोबर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार हे आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात १९ कोटी ७४ लाखांच्या रोकडसह ३२ कोटी ५ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील दोन दिवस कसून तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील ६ हजार ९५५ मतदान केंद्रावरील सर्व तयारी झाली असून १० हजार ९३५ पोलीस आणि २४ केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपले नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये २४४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्वात जास्त २४ उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदारसंघात, तर सर्वात कमी ७ उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत.

जिल्ह्यात ८९७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असून ३९४० मतदारांनी पोस्टल मतदान केले आहे. मुबलक प्रमाणात वोटिंग मशीन उपलब्ध असून ३० हजार ८६८ निवडणूक कर्मचारी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील ५ हजार ३७८ मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील ६५९ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा असणार आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टीएमटी बसची सुविधा

बुधवारी (२० नोव्हेंबर) होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महापालिका परिवहन सेवेने (टीएमटी) बसची व्यवस्था करून देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी १७३ बसगाड्या देण्यात आल्या. बुधवारी, रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण करून ठाणे स्टेशनवर पोहोचण्यासाठीही बस सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील. होरायझन शाळा, वागळे इस्टेट-आयटीआय आणि बेथनी हॉस्पिटल येथून ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम या मार्गावर ही सेवा उपलब्ध असेल, असे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितले.

मुरबाडमध्ये ५१८ मतदान केंद्रे

सर्वाधिक ५१८ मतदान केंद्रे ही मुरबाड आणि २६० मतदान केंद्रे ही उल्हासनगरमध्ये आहेत. जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पडावी याकरिता ६ हजार ९५५ मतदान केंद्रे सज्ज असून गृहनिर्माण सोसायटीमध्ये ३३७ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक युवक, एक महिला आणि एक दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत मतदान केंद्र चालविला जाणार आहे.

ओवळा-माजिवडा येथे सर्वाधिक मतदार

सर्वाधिक ५ लाख ४५ हजार मतदार हे ओवळा-माजिवडा मतदारसंघात असून सर्वात कमी २ लाख ८३ हजार ३९७ मतदार संख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहे. जिल्ह्यात ३८ लाख ४५ हजार ४२ पुरुष आणि ३३ लाख ८२ हजार ८८२ स्त्री मतदार असून १ हजार ६०३ तृतीयपंथी मतदार आहेत. ५६ हजार ९७६ मतदार हे ८५ वर्षांवरील असून ३८ हजार १४९ दिव्यांग मतदार आणि १ लाख ७२ हजार ९८१ हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली.

नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा !

ठाणे महापालिका क्षेत्रात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in