८४ कोटी ८० लाखांची पाणीपट्टी वसूल;  मीरा-भाईंदर महापालिकेने थकबाकीदारांच्या तोडल्या १०१ नळजोडण्या

८४ कोटी ८० लाखांची पाणीपट्टी वसूल; मीरा-भाईंदर महापालिकेने थकबाकीदारांच्या तोडल्या १०१ नळजोडण्या

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांसाठी महापालिकेला स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासह पम्पिंगचा विजेचा खर्च, वितरण व्यवस्था, देयक, आस्थापना आदींचा मोठा खर्च येतो. पाणीपुरवठा विभागाने ४१ हजार ६८३ रहिवासी नळजोडण्या तर ३ हजार २०४ व्यावसायिक नळजोडण्या दिल्या आहेत.

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी यंदा नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली असून २९ मार्चपर्यंत थकबाकीदारांच्या १०१ नळजोडण्या तोडल्या आहेत. तर ८४ कोटी ८० लाख ७४ हजार रुपये इतकी पाणीपट्टी वसूल केली असून ती ९३ . ४४ टक्के इतकी आहे.

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांसाठी महापालिकेला स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासह पम्पिंगचा विजेचा खर्च, वितरण व्यवस्था, देयक, आस्थापना आदींचा मोठा खर्च येतो. पाणीपुरवठा विभागाने ४१ हजार ६८३ रहिवासी नळजोडण्या तर ३ हजार २०४ व्यावसायिक नळजोडण्या दिल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीचे ९० कोटी ७५ लाख ८० हजार रुपये इतके पाणीपुरवठा विभागाचे उद्दिष्ट आहे. तर ९६ टक्के वा त्या पेक्षा जास्त पाणीपट्टी वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या व अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

त्याअनुषंगाने पालिकेने थकबाकीदारांच्या नळ जोडण्या तोडण्याचा इशारा दिला होता. ५ हजार पेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना पालिकेने नोटीस पाठवल्या. त्या नंतर देखील थकबाकी भरली नाही त्यांना नळजोडणी तोडण्याच्या अंतिम नोटीस पाठवण्यात आल्या.

वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई

९० कोटी ७५ लाख ८० हजार रुपये पाणीपट्टी पैकी २९ मार्चपर्यंत ८४ कोटी ८० लाख ७४ हजार रुपये इतकी म्हणजेच ९३ . ४४ टक्के इतकी पाणीपट्टी पाणीपुरवठा विभागाने वसूल केली आहे. ३० व ३१ मार्च या दोन दिवसात ५ कोटी ९५ लाख रुपये थकबाकी वसुलीचे आव्हान पाणीपुरवठा विभागास आहे. त्यातही दोन दिवसात चांगली वसुली करून ३१ मार्चपर्यंत ९६ टक्के इतकी वसुली पूर्ण करण्यात यश येईल अशी पालिकेला खात्री आहे. तर पाणीपट्टीचा धनादेश न वटल्यास दंडासह वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई पालिका करणार आहे.

थकबाकीदारांनी पाणीपट्टी भरावी म्हणून सुट्टीच्या दिवशी सुद्धा देयक स्वीकारण्याची केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत. २९ मार्चपर्यंत पालिकेने १०१ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. त्या थकबाकीदारांनी पाणीपट्टी भरल्यानंतर १ हजार रुपये शुल्क आकारून पुन्हा नळजोडणी जोडून दिली जाणार आहे. ३० व ३१ मार्च रोजी सुद्धा नळजोडणी तोडण्याची मोहीम सुरू राहणार असून त्यानंतर देखील थकबाकी भरली नाही तर कारवाई पुढे देखील सुरू ठेवू.

- शरद नानेगावकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in