प्रेयसीच्या मदतीने ६० वर्षीय व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडीतील गायत्रीनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका ६० वर्षीय इसमाने आपल्या २५ वर्षीय प्रेयसीच्या संगनमताने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
प्रेयसीच्या मदतीने ६० वर्षीय व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

भिवंडी : भिवंडीतील गायत्रीनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका ६० वर्षीय इसमाने आपल्या २५ वर्षीय प्रेयसीच्या संगनमताने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. तोच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ६० वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे तर त्याची २५ वर्षीय प्रेयसी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. गोपीनाथ गवळी असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. तर सोनी असे फरार प्रेयसीचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला भिवंडीतील गायत्रीनगर भागात राहत असून याच भागात ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. या व्यवसायात तिची १६ वर्षीय पीडित भाची तिला मदत करत असते. विशेष म्हणजे आरोपी गोपीनाथ हा पीडित मुलीचा नातेवाईक असल्याने त्यांची ओळख होती. तर ६० वर्षीय नराधमाचे आरोपी २५ वर्षीय महिला सोनीशी प्रेमसंबंध होते. सोनीचे दोन ते तीन विवाह झाले असून ती पतीपासून विभक्त राहत होती. त्यातच जून महिन्यात पीडित मुलगी आरोपी महिलेच्या घरी भाजी देण्यासाठी गेली होती, त्यावेळी गोपीनाथ हा घरातच होता. मुलगी एकटीच घरात आल्याचा फायदा घेत सोनीने पीडित मुलीच्या अंगावरील कपडे काढले तर ६० वर्षीय आरोपी प्रियकराने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती. त्याचबरोबर बदनामीच्या भीतीने पीडित मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर पीडित भयभीत असल्याचे पाहून तिला २ आणि ५ जून रोजी दोघा आरोपींनी रामनगर भागातील आरोपी महिलेच्या खोलीवर नेऊन तिच्यावर गोपीनाथने पुन्हा बलात्कार केला.

खळबळजनक बाब म्हणजे दोन्ही वेळी बलात्कार करतानाचे आरोपी सोनीने मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केले होते. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन याची वाच्यता केल्याच ठार मारण्याची धमकी देत असत. दरम्यान पीडित मुलगी घाबरून राहत असल्याचे मामीच्या लक्षात आल्याने तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३० जुलै रोजी मामीने याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या संदर्भात आरोपी गोपीनाथला काही तासातच पोलिसांनी अटक केली. मात्र या गुन्ह्यातील त्याला मदत करणारी आरोपी महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे.

logo
marathi.freepressjournal.in