डहाणूतील मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक

सागर सरिता ही मच्छीमार नौका २ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास धाकटी डहाणू येथुन मासेमारीसाठी आठ खलाशांसह निघाली होती. खोल समुद्रात जाळे टाकून जेवणाकरिता बसले असता अचानक एका मोठ्या मालवाहू जहाजाने नौकेस धडक दिल्याने नौकेचा पाठीमागचा भाग तुटून नौकेत पाणी भरण्यास सुरुवात झाली.
डहाणूतील मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक
Published on

पालघर : पालघरपासून २० नॉटिकल मैल खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या धाकटी डहाणू येथील सागर सरिता या मासेमारी नौकेला दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.२०च्या सुमारास मालवाहू जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या इतर मच्छीमार नौकांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त नौकेला समुद्रात बुडण्यापासून आणि जीवितहानी होण्यापासून वाचविण्यात यश आले. परंतु दुर्दैवाने मासेमारी नौकेला धडक देणाऱ्या मालवाहू जहाजाने सहकार्य न करता तेथून पळ काढल्याने मच्छीमार समाजामध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.

सागर सरिता ही मच्छीमार नौका २ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास धाकटी डहाणू येथुन मासेमारीसाठी आठ खलाशांसह निघाली होती. खोल समुद्रात जाळे टाकून जेवणाकरिता बसले असता अचानक एका मोठ्या मालवाहू जहाजाने नौकेस धडक दिल्याने नौकेचा पाठीमागचा भाग तुटून नौकेत पाणी भरण्यास सुरुवात झाली. तर दोन खालशी समुद्रात पडले. त्यांना कसेबसे नौकेवर घेत तुटलेल्या भागातून पाणी येत असलेल्या ठिकाणी चादरी व बिछान्यांचा वापर करून नौकेत येणारे पाणी थांबवून, वायरलेसवरून संपर्क करत हिमसाई या नौकेस मदतीसाठी बोलावल्यानंतर सागर सरिता या नौकेस धाकटी डहाणूच्या किनाऱ्यावर आणले.

या घटनेत भारतीय कोस्टगार्ड विभागाकडून कुठल्याच प्रकारचे मदतकार्य मिळाले नसल्यामुळे भारतीय कोस्टगार्डच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात कोस्टगार्ड विभागाकडून समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांना वाचविण्यासाठी अधिक तत्परता दाखविण्याची गरज असून, घडलेल्या घटनेत विभागातील बेजबाबदार व असंवेदनशील संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी मच्छीमार समाजाकडून होऊ लागली आहे.

प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी झाल्यास समुद्रातील १७ हजार एकर परिसरात मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास प्रतिबंध राहणार आहे. तसेच रायगडपासून ते डहाणूपर्यंतच्या समुद्रातील १३ हजार एकर परिसर मालवाहू जहाजांच्या जलवाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्या कारणाने पालघर जिल्ह्यात हजारो मासेमारी नौकांना मासेमारी करण्यासाठी धोका निर्माण होणार असून, घडलेली घटना पाहता भविष्यात असे प्रकार नियमित होणार आहेत.

- जितेन मर्दे, स्थानिक मच्छीमार, डहाणू

logo
marathi.freepressjournal.in