एक कोटीचे दागिने लंपास करणारा अटकेत

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डॉ. मुस रोडवरील राजवंत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात सेल्समन असलेला राहुल जयंतीलाल मेहता हा २५ मार्च २०२४ रोजी दुकानातील १ कोटी ५ लाखांचे दागिने घेऊन फरार झाला होता.
एक कोटीचे दागिने लंपास करणारा अटकेत

ठाणे : ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या सेल्समनने १ कोटी ५ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी सेल्समन राहुल जयंतीलाल मेहता यास नौपाडा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपीकडून ६२ लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. आरोपी चोरलेल्या पैशांवर मौजमजा करीत होता. तो मीरारोड येथे राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असतांना अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डॉ. मुस रोडवरील राजवंत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात सेल्समन असलेला राहुल जयंतीलाल मेहता हा २५ मार्च २०२४ रोजी दुकानातील १ कोटी ५ लाखांचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक सुरेश पारसमल जैन (५९) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले. तर त्याची पत्नीने नौपाडा पोलीस ठाण्यातच राहुल मेहताविरोधात मिसिंगची तक्रार दाखल केल्याचे देखील समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता आरोपी मीरारोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आले. दरम्यान, २६ मार्च रोजी आरोपी त्याच्या मैत्रिणीला भेटण्यास मीरारोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यास सापळा लावून मीरारोड परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून अपहार केलेल्या दागिन्यांपैकी ६२ लाख १० हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in