शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

जमीनविषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गेल्या दोन महिन्यांतील दुसरा गुन्हा आहे.
शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
Published on

उल्हासनगर : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करत हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत.

जमीनविषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गेल्या दोन महिन्यांतील दुसरा गुन्हा आहे. या गुन्ह्यांमुळे महेश गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश हे २५ दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते. आत्ताच ते सुस्थितीत होऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले होते.

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सद्रुद्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एफ. एस. ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम करणारी कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in