विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेत १२ जानेवारी रोजी दुपारच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी झुंबड केली होती.
विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

मोखाडा : मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेतील रुद्राक्ष पागी या नववीतील विद्यार्थ्याला लाडु घेतल्याच्या कारणावरून येथील ललित अहिरे या शिक्षकाने काठीने अमानुष मारहाण केली होती. या घटनेची बातमी 'नवशक्ति'ने प्रसिद्ध केली होती. या बातमी व घटनेची गंभीर दखल घेत, स्थानिक आदिवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अखेर रूद्राक्षचे वडिल दत्ता पागी यांनी मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी वरून ललित अहिरे या शिक्षकावर मारहाण तसेच अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यान्वये मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेत १२ जानेवारी रोजी दुपारच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी झुंबड केली होती. यावेळी नववीत शिक्षण घेत असलेल्या रुद्राक्ष पागी या विद्यार्थ्याच्या हातात दोन लाडू आढळल्याने, येथील ललित अहिरे या शिक्षकाने ओल्या बांबुच्या काठीने रूद्राक्ष ला अमानुष मारहाण केली.

त्यामुळे रुद्राक्ष जमिनीवर खाली कोसळला. त्याच्या छाती, मान आणि पाठीवर बांबूचे लाल व्रण उमटले होते. त्याला त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी कारेगांव येथील आरोग्य पथकात नेऊन उपचार केले. या घटनेची बातमी १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कारेगांव आश्रमशाळेला भेट दिली. तसेच करोळ या गावी जाऊन विद्यार्थ्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. १८ जानेवारी रोजी रुद्राक्षचे वडील दत्ता पागी यांनी ललित अहिरे या शिक्षकाविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in