धोकादायक इमारतीची दुरुस्ती करतांना स्लॅब कोसळल्याने मजुराचा जागीच मृत्यू

धोकादायक इमारतीची दुरुस्ती करतांना स्लॅब कोसळल्याने मजुराचा जागीच मृत्यू

कोमल पार्क ही इमारत धोकादायक असल्याने यापूर्वी 2 ऑगस्ट 2021 व 4 मे 2022 आणि 14 जून 2022 अशा तीन नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या

फ्लॅटची दुरुस्ती करताना 5 व्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळल्याची घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. यात एका बिगारीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा बिगारी गंभीर जखमी झाला आहे.

गोलमैदान या उच्चभ्रू परिसरात कोमल पार्क ही 6 मजल्याची इमारत असून त्यात 21 फ्लॅट आणि 2 दुकाने आहेत. पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 502 च्या हॉलमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. फ्लॅटच्या मालकाचे नाव जतीन चैलानी असून त्यांनी हा फ्लॅट जानकीदेवी जयसिंघानी यांना भाड्याने दिलेला आहे. फ्लॅटच्या हॉलची दुरुस्ती दोन बिगारी करीत असताना हॉलचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला. त्याखाली एक बिगारी मृत्युमुखी पडला असून एक जखमी झाला आहे. त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेची माहिती समजताच आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, समाजसेवक मनोज साधनानी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, अग्निशमन दलाचे पथकाने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना बाहेर काढले आहे.

कोमल पार्क ही इमारत धोकादायक असल्याने यापूर्वी 2 ऑगस्ट 2021 व 4 मे 2022 आणि 14 जून 2022 अशा तीन नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. सदरची इमारत ही सी-2 बी (इमारतीत राहून दुरुस्ती) या प्रकारात मोडत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. दरम्यान मागच्या वर्षी मोहिनी पॅलेस आणि साईशक्ती या दोन इमारतींचे स्लॅब कोसळून 12 निरपराध नागरिकांचा जीव गेला होता. तेंव्हा नगरविकास व पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र ती मदत अद्यापही मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत असून आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in