महायुतीच्या प्रचाराचा ३ एप्रिलला ठाण्यात होणार प्रारंभ; शुभारंभाच्या मेळाव्याची शंभूराज देसाईंनी केली घोषणा

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते, त्यामुळे ठाणे शिवसेनेला देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे समजते. ठाण्यातील महामेळाव्यातही आता उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या प्रचाराचा ३ एप्रिलला ठाण्यात  होणार प्रारंभ;  शुभारंभाच्या मेळाव्याची शंभूराज देसाईंनी केली घोषणा
संग्रहित छायाचित्र, पीटीआय

ठाणे : एकाबाजूला ५ जागांवरील महायुतीमधील तिढा अद्याप सुटलेला नसताना महायुतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ ठाण्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा शंभूराज देसाई यांनी केली आहे. ठाणे शिवसेनेला देऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग भाजपला देण्याचा तह शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्षावर झाला असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पहिल्या मेळाव्याची घोषणाही झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभेवर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढणार आहेत. तर ठाण्यातून रवींद्र फाटक यांचे नाव पुढे आले आहे. स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक दोन वर्ष न झाल्याने रवींद्र फाटक यांना आमदारीकने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्यांना आता लोसकभेचे वेध लागले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ खासदारकीच्या तिकिटाची मागणी केली आहे.

शनिवारी मध्यरात्री ठाणे शिवसेनेला देण्यासंदर्भात चर्चा झाल्यांनतर रविवारी रवींद्र फाटक यांना वर्ष बंगल्यावरचे निमंत्रण आले होते. ते सागर बंगल्यावरही जाऊन आल्याचे समजते. त्यानंतर महायुतीच्या मेळाव्याची घोषणाही ठाण्याचे पालक मंत्री असलेल्या शंभूराजे देसाई यांनी केली आहे. ठाण्यात ३ एप्रिलला महायुतीचा मेळावा घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मतदार संघात हे महायुतीचे मेळावे होतील. आणि तीनही पक्षाचे नेते या मेळाव्यांना उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते, त्यामुळे ठाणे शिवसेनेला देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे समजते. ठाण्यातील महामेळाव्यातही आता उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भिवंडी लोकसभेसाठी भाजपने पहिल्या यादीमध्ये कपिल पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. तर आता ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवार शिवसेना जाहीर करील. ठाणे लोकसभेसाठी जर रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली तयारी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे सच्चे कार्यकर्ते असलेले आणि एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले रवींद्र फाटक आणि राजन विचारे एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in