शिंदे गटाच्या ठाण्यात जोरबैठका; शिवसेनेला १३ ते १४ जागांची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली.
शिंदे गटाच्या ठाण्यात जोरबैठका; शिवसेनेला १३ ते १४ जागांची अपेक्षा

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. यावेळी महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढण्यावर तसेच ४५ प्लस जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेनेला १३ ते १४ जागा मिळतील, असा देखील सूर बैठकीत निघाल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मावळचे श्रीरंग बारणे, पालघरचे राजेंद्र गावित तसेच मुंबईचे राहुल शेवाळे आदींसह अनेक खासदार उपस्थित होते. यावेळी बैठकीत अनेक शंकाकुशंका तसेच दावेप्रतिदावे आदीसंदर्भात बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. प्रत्येक खासदाराने मतदारसंघांतील कामे व आपल्या दावेदारीचा उहापोह केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात ४५ प्लस जागा कशा निवडून येतील. या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचे खासदारांनी माध्यमांना सांगितले.

भाजपने काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून दावा ठोकण्यात आल्याने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

शिंदे गटात चिंता

काही जागा भाजपला सोडल्या जाणार असून उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा विरोधकांकडून मतदारसंघात सुरू झाल्याने महायुतीबाबत दूषित वातावरण निर्माण होत आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, अशी चिंता अनेक खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

  • एकजुटीने लढण्याचा निर्धार

  • ४५ प्लस जागा मिळविणार

  • जागावाटपात विद्यमान खासदारांना प्राधान्य

  • काही जागांबद्दल चिंता

  • पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणार

  • कामांचा घेतला आढावा

  • दावे, प्रतिदाव्यावरही चर्चा

logo
marathi.freepressjournal.in