ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

तीन मित्रांनी तिला भिवंडी काल्हेर परिसरातील दुर्गेश पार्क सोसायटीमधील एका इमारतीच्या रूममध्ये नेले
ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाण्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला भिवंडीच्या काल्हेर येथे नेऊन एका फ्लॅटमध्ये तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर चितळसर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात घडलेल्या या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या अटक आरोपीत सचिन कांबळे (३०), आकाश कनोजिया (२२) आणि आशू अशा तिघांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील १६ वर्षीय पीडितेच्या ओळखीच्या तीन मित्रांनी तिला भिवंडी काल्हेर परिसरातील दुर्गेश पार्क सोसायटीमधील एका इमारतीच्या रूममध्ये नेले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला विरोध करताच पीडितेचे हात बांधून तिन्ही आरोपींनी तिला विवस्त्र केले. तिने प्रतिकार करताच आरोपी सचिन याने तरुणीला मारहाण केली. आकाश याने शरीरावर चावे घेतले, तर आरोपी आशू यानेही कानशिलात मारली. त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तरुणीवर अत्याचार केले.

दरम्यान, पीडित तरुणीने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी घटनास्थळी भेट दिली. आरोपी सचिन, आकाश आणि आशू या तिघांना गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने शिताफीने अटक करत चितळसर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा अधिक तपास चितळसर ठाण्याचे पोलीस पथक करत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in