ठाणेकर मुख्यमंत्र्यांपुढे समस्यांचा डोंगर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त प्रयत्नच करणार नाहीत तर त्या सोडवतील आणि सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा देतील
ठाणेकर मुख्यमंत्र्यांपुढे समस्यांचा डोंगर

गेले आठ वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात फक्त शिंदे समर्थकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही आनंदित झाला आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य ठाणेकर राज्याचा प्रमुख झाला असल्याने त्यांनाही मूलभूत समस्या माहित आहेत, त्यामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त प्रयत्नच करणार नाहीत तर त्या सोडवतील आणि सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा देतील अशी अशा जिल्हावासियांच्या मनात आहे.

शहरात पार्किंगची समस्या बिकट

ठाणे शहरात पार्किंगची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. आता तर गाड्या पार्क करण्यासाठी शहरात पार्किंग प्लाझा नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या करण्यात येत आहेत, महापालिकेच्या पार्किंग धोरणाचे घोडेही लालफितीच्या कारभारात अडकले आहे. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत, हा प्रश्न महापालिकेच्या अधिपत्याखाली असला तरी लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न जटिल होऊ लागला आहे. ठाणे शहराचे नागरिकरण झपाटयाने वाढत असल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. ठाणे स्टेशनकडे येणा-या वाहनधारकांची संख्या मोठया प्रमाणावर असून, दिवसेंदिवस पार्किग समस्या बिकट होत आहे. मंजूर विकास आराखड्यातील पार्किंगसाठी असलेले भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील पार्किंगची परिस्थिती सध्या खूपच भयावह आहे. सध्या शहरात पोखरण रोड क्रमांक २ येथील आशर रेसिडन्सीमधील सुविधा भूखंडावर बिल्डरने पार्किंग प्लाझा बांधून दिला आहे. या ठिकाणी अवघी ६१ चारचाकी वहाने आणि ४४ दोन चाकी गाड्या पार्क करण्याची व्यवस्था आहे. मात्र हा पार्किंग प्लाझा शहराबाहेर आहेतर सध्या स्मार्टसिटी योजनेतून गावदेवी मैदानात अंडर ग्राउंड पार्किंग प्लाझा करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे पालिकेच्या सर्वात जुन्या जवाहर बाग अग्निशमन केंद्राची धोकादायक इमारत पाडून त्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय झाला होता. परंतू बीओटी तत्वावरील या पार्किंग प्लाझाचे काम कधी सुरू होणार आणि त्याचा फायदा नागरीकांना कधी होणार हेही गुलदस्त्यात आहे.

धोकादायक इमारतींचा प्रश्न जटिल

धोकादायक इमारती खाली करणे, खाली करुन ती निष्कासित करणे, निष्कासित करण्यात आलेल्या इमारतींची पुर्नबांधणी विशेष म्हणजे त्यातील भाडेकरू आणि मालकाचे अधिकार संरक्षित करण्यासाठी महापालिकेने काही मागदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार इमारतीची पुर्नबांधणी करतांना भाडेकरूचे हक्क जपले जातील असेही सांगण्यात येत आहे. मात्र महापालिकेच्या या मार्गदर्शक तत्वांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे भाडेकरूच्या भल्यासाठी राज्यसरकारने कायदा करावा अशी मागणी करण्यात येत होती, मात्र तसा कोणताही कायदा अदयाप झालेला नाही. महापालिका हद्दीत कोसळणा-या इमारतींचा धोका लक्षात घेऊन तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती खाली करताना किंवा निष्कासित करताना निर्माण होणा-या अडीअडचणींतून मार्ग निघावा. यासाठी प्रचलित कार्यवाहीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने मार्गदर्शकतत्वे तयार केली आहेत. धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडीट करणे बंधणकारक आहे. जी इमारत दुरुस्तीयोग्य नसेल ती तत्काळ खाली करावी लागते. धोकादायक इमारती निष्कासित करण्याची कार्यवाही करताना मालक, भाडकरू यांचे सर्व कायदेशीर हक्क अबाधित राहतील याबाबतची काळजी घेण्यात आली असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. इमारतींच्या पुर्नबांधणीचे आराखडे शहरविकास विभागाकडे पाठविल्यानंतर सदर आराखडे मंजूर करताना त्या इमारतीमधील भाडेकरूच्या कायमस्वरुपी निवासाची व्यवस्था करण्याचा समझोता झाल्याचा करार स्वरुपातील दस्ताऐवज सादर केल्याशिवाय तसेच १०० टक्के भाडेकरूंची मंजुरी असल्याशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देता येणार नाही, असेही या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र याला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे या क्षेत्रात काम करणार्‍या जाणकारांचे मत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या भाडेकरू कायद्यानुसार तो मालक होण्याची तरतूद नाही. ठाणे शहरात ३० वर्षे जून्या २५ हजार इमारती असून त्यात हजारो भाडेकरू पागडी पध्दतीने वास्तव्यास आहेत. महापालिकेच्या मागदर्शक तत्वांना कायदेशीर आधार नसल्याने सध्या हे हजारो भाडेकरू वार्‍यावर आहेत. या भाडेकरूंना न्याय देण्यासाठी कायदा करावा लागणार आहे.

घोडबंदर रस्ता असून अडचण,

नसूनही खोळंबा

घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी सुटावी यासाठी गेल्या दशकापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी या परिसरात चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र तरी वाहतूककोंडी सुटलेली नाही उलट रात्री अवजड वाहनांमुळे परिस्थिती अधिक बिकट होवू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घोडबंदर परिसरा हा दाट जंगलांनी व्यापलेला होता परंतू अवघ्या काही वर्षात हा विभाग अत्यंत वेगाने विकसित झाला असून नागरीकरण प्रचंड वाढले आहे.

घोडबंदर हा ठाणे ते बोरीवली, मिराभाईंदर, वसई विरार तसेच पालघर, डहाणू, तलासरी मार्गे गुजरात राज्य या मध्य तसेच पश्‍चिम मार्गांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. सुरूवातीला कच्च्या असणार्‍या या रस्त्याचे अवघ्या काही वर्षांपूर्वी रूंदीकरण झाले. मात्र रस्ता एकमेव असल्यामुळे तसेच कापूरबावडी नाक्यावर भिवंडी, ठाणे शहर, मानपाडा, घोडबंदर या मार्गवरून जाणार्‍या वाहनांची संख्या प्रचंड असल्यामुळे वाहतूकोंडीचा त्रास काही कमी झाला नाही, उलट दिवसेंदिवस वाढला.

या रस्त्यावर कायम मोठी वाहतूककोंडी होत असते ही वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी कापुरबावडी नाका ते वाघबीळ या परिसरात चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे यामार्गावरून जलद गतीने जाण्यासाठी मदत होईल आणि वाह्तुकोंडी कमी होईल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. मुळात या रस्त्याला समांतर रस्ता नसल्याने एखादी गाडी बंद पडली तर तासन तास वाहतूककोंडी होत असते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in