
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लगत असूनही ठाणे जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचे चित्र आहे. या जिल्ह्यात दळण -वळणाची साधने मुबलक उपलब्ध असली तरी, ज्या प्रमाणात रेल्वेसेवा आणि रस्त्यांची निर्मिती व्हायला हवी त्या प्रमाणात मात्र झालेली नाही. याच प्रकारे गेली कित्येक वर्षे रखडलेल्या
डहाणू - नाशिक आणि कल्याण - नगर रेल्वेला चालना मिळालेली नाही. या मार्गाचे वेळोवेळी सर्वेक्षण करण्यात आले, मात्र ठोस निर्णय काही झालेला नाही. आता चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या कल्याण -मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याचे हमीपत्र नुकतेच राज्य सरकारने रेल्वेबोर्डाला दिल्याने तीन दशकापासून प्रलंबित असलेल्या कल्याण - नगर रेल्वे मार्गाला आशेचा किरण दिसू लागला आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने स्वातंत्रपूर्व काळापासून मागणी असलेल्या डहाणू - नाशिक रेल्वेमार्गाकडे केंद्रसरकारचे आता तरी लक्ष जाईल का ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातून उपनगरीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि रेल्वेला वर्षाला हजारो कोटी रूपयांचा महसूल मिळवून देतात. मात्र या प्रवाशांच्या नशिबी सुखकारक प्रवास कधीच येत नाही. भारतीय रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली. मात्र ठाणे जिल्ह्यातील रेल्वे मार्गासंदर्भात काही अमुलाग्र परिवर्तन व्हावे,बदल व्हावे यासाठी गेली कित्येक दशके प्रयत्न झालेले नाहीत. मिळालेल्या माहिती नुसार कल्याण-नगर रेल्वेसाठी तत्कालीन कृषी मंत्री शरदचंद्र पवार ,तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी, ममता बॅनर्जी, सुरेश प्रभू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विवेक सहाय यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारच्या नियोजन विभागाने ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी शिफारस राज्य वित्त आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रत्नाकर महाजन यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. मात्र,त्यावेळी केंद्र सरकारने नवे प्रकल्प न घेण्याचे धोरण स्वीकारले, आणि या महत्वाचा प्रकल्प रेंगाळला असल्याचे उघड झाले होते.
सर्व्हेत या रेल्वेमार्गाची लांबी १६८ किमी. १२ रेल्वे स्टेशन्स आणि ८३३ कोटी रूपयांचा खर्च दाखवण्यात आला होता. मात्र एवढा खर्च केल्यानंतर आवश्यक नफा मिळणार नाही, हे कारण देत या प्रकल्पाची फाईल गुंडाळण्यात आली होती.
दरम्यान गेल्या दशकात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमधे डहाणू नाशिक रेल्वेमार्गाला हिरवा कंदिल दाखवत पुन्हा
सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते.
मात्र त्यानंतरही डहाणू नाशिक हा महत्वाचा रेल्वे मार्ग रेंगाळला आहे.
कल्याण नगर रेल्वेसाठी
१९७० पासून प्रयत्न
ठाणे जिल्ह्यातील शहरी परिसरात ज्या प्रमाणात नागरीकरण वाढले त्या प्रमाणात ग्रामीण परिसर मात्र उपेक्षित आणि विकासापासून वंचित राहीला आहे. ठाणे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसराच्या विकासाठी मोलाचा दगड ठरेल असा रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी १९७० पासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र फक्त घोषणा आणि सर्वेक्षण करण्यापलीकडे फारसे काम झालेले नाही.
कल्याण - मुरबाड - नगर रेल्वे झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागणाार असून, बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळून औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळेल. मुरबाड तालुक्यात रेल्वे प्रशासनाचा रेल्वेसंदर्भात उद्योग सुरू करण्याचा संकल्प आहे. मात्र या घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार याची केवळ गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा सुरु असताना कल्याण मुरबाड रेल्वेमुळे या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गालाही गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.