मलंगगड दुर्घटनेची पुनरावृत्ती भिवंडीतही? लाखो नागरिकांचा जीव डोंगरातच गुदमरलेला!

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व कोसळलेल्या सरींनी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथील दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जणाचा नाहक बळी गेला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

सुमित घरत/ भिवंडी

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व कोसळलेल्या सरींनी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथील दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जणाचा नाहक बळी गेला आहे. त्याच धर्तीवर भिवंडीतही महापालिका हद्दीतील पाच प्रभागातील दरडप्रवण क्षेत्रातील लाखो नागरिक पावसाळ्यात जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. तर महापालिका प्रशासनाने अशा क्षेत्रातील नागरिकांना पावसाळ्या पूर्वीच अधिसूचनेद्वारे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असतानाही सदर ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांची परिस्थिती अतिशय दीन दुबळी असल्याने त्यांना पावसाळ्यात जीवन-मरणाशी झुंज द्यावी लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ मध्ये नारपोली, गायत्रीनगर, नवी वस्ती, अजमेर नगर, हनुमान टेकडी, साईप्रसन्न सोसायटी, फुले नगर १, २ आणि साठेनगर आदी ८ ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये लाखोंच्या संख्येने रहिवाशी अनेक वर्षांपासून पावसाळ्यात जीव टांगणीला धरून राहत आहेत. अशातच पावसाळ्याच्या प्रारंभीच मलंगगड दरड प्रवण क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेने दरड प्रवण क्षेत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, २६ मे रोजीच भिवंडी महापालिका हद्दीतील डोंगरमाथ्यावर आणि टेकड्यांवरील रहिवाशांना व मधील सखल भागातील रहिवाशांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मान्सूनपूर्व तयारी म्हणून डोंगरी भागात उंच टेकड्यांवर राहणारे रहिवासी यांना पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याकरीता मनपा कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली असून, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. परंतु वास्तविक पावसाळा सुरू झाल्यानंतर डोंगराचा भाग खचून अपघात होत असतात. या वसाहती पूर्णपणे अनधिकृत व सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्या पूर्वी या वसाहती पालिकेने उठवून त्यांना शासनाच्या योजनांतर्गत वसाहतीमध्ये स्थलांतरित करणे अपेक्षित आहे. परंतु ही मानसिकता नसल्याने प्रशासनाकडून ही कागदोपत्री कारवाई केली जात आहे.

स्थलांतराची मागणी : कल्याण पूर्वेत मागील काही वर्षांत दरड प्रवण क्षेत्रात दुर्घटना घडून आतापर्यंत ३ जणांचा जीव गेला आहे, तर अंबरनाथच्या मलंगगड येथील सोमवारी १० जून रोजी घडलेल्या दुर्घटनेत १ जणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कसारा, माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटना नित्याच्या असून, लाखो रुपये खर्चाचे फक्त कागदी घोडे संबंधितांकडून अनेकवेळा नाचवले जात आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करून दरड प्रवण क्षेत्रात जीव मुठीत धरून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना शासनाच्या योजनेंतर्गत वसाहतीत स्थलांतरित करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in