अप्पर तहसीलदार कार्यालयातून वाळूचा डम्पर पळवला

रेतीची बेकायदा वाहतूक असल्याने अप्पर तहसीलदार यांनी ५ पट दंड आकारण्याचा निर्णय घेत शास्तीसह ४ लाख २३ हजारांचा दंड ठोठावला.
अप्पर तहसीलदार कार्यालयातून वाळूचा डम्पर पळवला

भाईंंदर : गौण खनिज परवानगीशिवाय रेतीच्या वाहतूकप्रकरणी जप्त केलेला रेतीने भरलेला डम्पर हा भाईंदरच्या अप्पर तहसीलदार कार्यालयातून पळवल्याप्रकरणी महसूल विभागाने डम्परच्या चालक-भागीदारासह एकूण तिघांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर-उत्तनचे तलाठी अनिता पाडवी यांनी मॅक्सस मॉलजवळ रेतीने भरलेला डम्पर ताब्यात घेतला होता. सुमारे ४ ब्रास रेती वाहतूक करणाऱ्या डम्परचालक उमेश बहिर व भागीदार हनुमंत देवकुळेकडे गौणखनिज वाहून नेण्याचा परवाना नसल्याने पाडवी यांनी डम्पर जप्त करत तो अप्पर तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करून जमा केला होता.

रेतीची बेकायदा वाहतूक असल्याने अप्पर तहसीलदार यांनी ५ पट दंड आकारण्याचा निर्णय घेत शास्तीसह ४ लाख २३ हजारांचा दंड ठोठावला. परंतु दंडाचा आदेश संबंधितांनी स्वीकारला नाही आणि तो दंड भरला नाही. दरम्यानच्या काळात अप्पर तहसीलदार कार्यालय आवारातून रेतीने भरलेला डम्पर हा चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने अप-अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तलाठी पाडवी यांना २९ जानेवारीच्या पत्रान्वये प्राधिकृत केले. ९ फेब्रुवारी रोजी भाईंदर पोलिसांनी पाडवी यांच्या फिर्यादीवरून, गौणखनिज वाहतूक परवान्याशिवाय रेती वाहतूक करणारा जप्त केलेला डम्पर शासनाचा दंड न भरता पळवून नेल्याबद्दल चालक उमेश बहिर व भागीदार हनुमंत देवकुळे व संजू शेळके अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in