पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा मृत्यू; श्वानदंश झालेल्या 'त्या' १४ जणांचा शोध सुरू

ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांच्या नावांची नोंद असली, तरी त्यांचे पूर्ण पत्ते व मोबाईल क्रमांक उपलब्ध नाहीत. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या रुग्णांचा शोध घेत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा मृत्यू; श्वानदंश झालेल्या 'त्या' १४ जणांचा शोध सुरू

बदलापूर : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या इसमाचा महिन्याभरानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बदलापुरात समोर आली आहे. त्यानंतर आता नगरपरिषद प्रशासनाने या श्वानाने चावा घेतलेल्या अन्य इसमांचा शोध सुरू केला आहे.

येथील रेल्वे कर्मचारी नितीन मांडवकर यांना रस्त्यावरून जात असताना २२ फेब्रुवारी रोजी एका भटक्या पिसाळलेल्या श्वानाने हल्ला करत चावा घेतला होता. त्यामुळे मांडवकर यांनी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन लसीकरण घेतले होते; मात्र त्यानंतर महिनाभराने अचानक ताप आल्याने त्यांना बदलापूरतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांना तेथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

मांडवकर यांचा चावा घेतलेल्या श्वानाने अन्य १४ जणांचा चावा घेतला असून, त्यांनीही बदलापूर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांच्या नावांची नोंद असली, तरी त्यांचे पूर्ण पत्ते व मोबाईल क्रमांक उपलब्ध नाहीत. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या रुग्णांचा शोध घेत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे.

श्वानदंशानंतर पाच इंजेक्शन घेतात. मांडवकर यांनी बदलापूर ग्रामीण रुग्णालयातून चार डोस घेतले होते. त्यांना अँटीबॉडीजचे इंजेक्शन देण्यात आले होते. तोंडाला चावा घेतलेला असल्याने त्यांना सर्जिकल ओपिनियन घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता. त्यासाठी ते सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे गेले होते. नंतर रेल्वे रुग्णालयात गेले व नंतर घरीच थांबले. नंतर त्रास होऊ लागल्याने ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये व शेवटी कस्तुरबा रुग्णालयात गेले. परंतु ही अतिशय दुर्दैवी घटना असून वैद्यकीय उपचार आणि मृत्यूच्या कारणाबाबत माहिती घेत आहोत.

- डॉ. राजेश अंकुश, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कुळगाव-बदलापूर नगर परिषद

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in