आदित्य ठाकरे यांना ठाणे जिल्ह्यातून धक्का; शेकडो युवासैनिकांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पाठींबा त्यांनी जाहीर केला
आदित्य ठाकरे यांना ठाणे जिल्ह्यातून धक्का; शेकडो युवासैनिकांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला एकामागून एक धक्के देत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील धक्का दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवासैनिक आणि युवतीसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्यासोबत युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पाठींबा त्यांनी जाहीर केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवण अंगीकारून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर त्यांना मिळणारा पाठींबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधी ठाणे त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर उल्हासनगर येथील शिवसेनेच्या अनेक नगरसेवकानी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. तर भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेदेखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि युवासेनेचे निखिल बुडजडे, विराज म्हामुणकर आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in