
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील दावडीमधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रील लावले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता, असा आरोप करत विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी करत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
परी छोटूलाल बिंद असे मृत्यू पावलेल्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. छोटूलाल हे पत्नी व दोन मुलीबरोबर नालासोपारा येथे राहतात. छोटूलाल हे आपल्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन डोंबिवलीत राहत असलेल्या भावोजीकडे पूजेकरीता आले होते. घरी पूजा सुरू असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. याचदरम्यान गॅलरीला ग्रील नसल्याने परीचा तोल गेल्याने इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. परी खाली पडल्याचे कळताच परीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
याप्रकरणी परीच्या वडिलांनी इमारतीच्या विकासकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.