भटक्या कुत्र्याने चिमुकलीवर केला हल्ला

हल्ल्यात चिमुकलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्याने चावा घेत तिला गंभीर जखमी केले
भटक्या कुत्र्याने चिमुकलीवर केला हल्ला
Published on

उल्हासनगरमध्ये घराच्या बाहेर बसलेल्या ४ वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने केला केला आहे. या हल्ल्यात चिमुकलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्याने चावा घेत तिला गंभीर जखमी केले. आरोही शेळके असे या चिमुकलीचे नाव असून ती कॅम्प ४ च्या नालंदा नगर सुभाष टेकडी परिसरात राहते. १६ जूनला सकाळी आरोही घराबाहेर बसली होती. यावेळी अचानक भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आरोही गंभीर जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तिच्या आई वडिलांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र त्यांच्याकडे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण देत कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले. इथे देखील इंजेक्शन नसल्याचे सांगून त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. या सगळ्यामुळे कुत्रा चावल्यानंतर त्याच रक्तबंबाळ अवस्थेत या चिमुकलीला तब्बल सहा ते सात तास उपचारापासून वंचित राहावे लागले. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांवर कोणताच बंदोबस्त करत नसल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याचा आरोप आरोहीच्या कुटुंबियांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in