तुझ्या हातात दोन लाडू कसे? जेवणासाठी गर्दी केली म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण, आदिवासी संघटना आक्रमक

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
तुझ्या हातात दोन लाडू कसे? जेवणासाठी गर्दी केली म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण,  आदिवासी संघटना आक्रमक

मोखाडा : मोखाड्यातील कारेगाव शासकीय आश्रमशाळेतील ९ वीतील रूद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जेवणासाठी झुंबड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून, ललित अहिरे या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत. त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी १२ जानेवारीला दुपारच्या जेवनाच्या वेळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी एकच झुंबड केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त न लावता येथील शिक्षक ललित एल अहिरे यांने तुझ्या हातात दोन लाडू कसे, असे विचारत रूद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि प्रचंड घाबरला. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षक धर्मेंद्र कुर्वे हे देखील आश्रमशाळेत उपस्थित नव्हते; मात्र ते परत आले, तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांला रुग्णालयात नेले असून, त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत कारेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच शिक्षक एल. एल. अहिरे यांना या मारहाणीबाबत कडक शब्दांत समज दिली असून, त्यांनी रुद्राक्षच्या पालकांची माफी मागितली असून, पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in