एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना लुटणाऱ्या चोराला अटक

एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना लुटणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे...
एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना लुटणाऱ्या चोराला अटक

कल्याण : एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना लुटणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. दीपक बिपीन झा (३२, रा. रमाबाई आंबेडकर नगर, उल्हासनगर) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने कल्याण, वसई, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मुंब्रा, नवी मुंबई, नांदेड व नाशिक जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत एकूण १६ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अटक आरोपींकडून १६ गुन्ह्यांतील वेगवेगळ्या बँकांची ९२ एटीएम कार्ड, २६ हजार रु. रोख रक्कम व एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी, पोउनि तानाजी वाघ, पोहवा के. जी. जाधव, मनोहर चित्ते, जितेंद्र चौधरी, पोना आनंद कांगरे, किशोर सूर्यवंशी, सुमित मधाले, पोशि दीपक थोरात, श्रीधर वडगावे यांनी केली आहे.

कल्याणच्या महात्मा फुले चौक पो. स्टे. हद्दीत एक महिला त्यांच्या आईसोबत कल्याण पश्चिम येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याकरिता गेल्या असता दोन अनोळखी इसमांनी मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादीचे एटीएम कार्ड अदलाबदली करून फिर्यादीच्या अकाऊंटमधून २२ हजार रुपये लबाडीने काढून घेत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली होती. या घटनेबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले होते.

तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून दीपक बिपीन झाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने त्याच्या साथीदारासह एटीएम सेंटरमधून एटीएम कार्ड हातचलाखीने अदलाबदल करून बोलण्यात गुंतवून पिन नंबर पाहून एटीएममधून पेसे काढून फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in