'आपला दवाखाना'चा ठेकेदार अखेर काळ्या यादीत; आ. संजय केळकर यांच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय
'आपला दवाखाना'चा ठेकेदार अखेर काळ्या यादीत; आ. संजय केळकर यांच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय

'आपला दवाखाना'चा ठेकेदार अखेर काळ्या यादीत; आ. संजय केळकर यांच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय

काही दिवसांपूर्वीच आमदार संजय केळकर यांनी या ठेकेदाराच्या अनियमित कारभाराचे बिंग फोडत प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर पालिकेने केवळ कागदी हालचाली केल्या; मात्र केळकर यांच्या पुनःश्च हस्तक्षेपानंतर अखेर ठोस कारवाई करण्यात आली.
Published on

ठाणे : ठाणे शहरातील ‘आपला दवाखाना’ चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर अखेर ठाणे महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संजय केळकर यांनी या ठेकेदाराच्या अनियमित कारभाराचे बिंग फोडत प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर पालिकेने केवळ कागदी हालचाली केल्या; मात्र केळकर यांच्या पुनःश्च हस्तक्षेपानंतर अखेर ठोस कारवाई करण्यात आली.

मंगळवारी आमदार केळकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाईचा आढावा घेतला. या भेटीत आयुक्त राव यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे स्पष्ट केले, तसेच ‘आपला दवाखाना’तील डॉक्टर, परिचारिका आणि जागा मालकांचे थकीत वेतन व भाडे दोन दिवसांत अदा केले जाईल, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली.

‘आपला दवाखाना’ केंद्रांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबाबत महापालिका प्रति रुग्ण १५० रुपये इतके मानधन कंपनीस देत होती. तरीही डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनेक महिन्यांपासून थकीत होते. ही बाब कर्मचाऱ्यांनी आ. संजय केळकर यांच्या जनसंवाद उपक्रमात मांडल्यानंतर त्यांनी मनपाला जाब विचारला. यानंतर प्रशासनाने कंपनीच्या पावणेतीन कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीमधून थकीत वेतन व भाडे अदा करण्याचा निर्णय घेतला होता. आता या प्रकरणात निर्णायक पाऊल उचलत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.

‘आपला दवाखाना’ योजनेला पर्याय म्हणून ठाण्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ६८ ‘आरोग्य मंदिर’ उभारणीचे नियोजन करण्यात आले असून सध्या ४३ आरोग्य मंदिरांचे काम सुरू आहे. या आरोग्य सेवेचा खरा लाभ गोरगरीबांपर्यंत पोहोचतो का नाही, यावर स्वतः आयुक्तांनी थेट देखरेख ठेवावी.

संजय केळकर, आमदार

५० ऐवजी ४६ दवाखान्याची स्थापना

महापालिका क्षेत्रात २०२० पासून ५० ‘आपला दवाखाना’ केंद्रे सुरू करण्याचे कंत्राट कर्नाटकस्थित मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. मात्र करार कालावधीत कंपनीने केवळ ४६ दवाखानेच सुरू केले आणि मुदतवाढ देऊनही उर्वरित केंद्रे सुरू करण्यात अपयश आले.

logo
marathi.freepressjournal.in