ठाणे जिल्ह्यातील राजकारणात निरव शांतता,एकनाथ शिंदे यांना पुर्ण पाठिंबा

ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व आहे
ठाणे जिल्ह्यातील राजकारणात निरव शांतता,एकनाथ शिंदे यांना पुर्ण पाठिंबा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४०हून अधिक आमदार घेऊन गुवाहाटीत मुक्काम ठोकला असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आलेले असताना शिवसेनाही फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. गेल्या पाच दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरता पसरली असताना, ठाणे जिल्ह्यातील राजकारणात निरव शांतता पसरली आहे. पालघर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे सध्याचे शिवसेनेतील बहुतांशी पदाधिकारी असल्याचे उघड होऊ लागले आहे; मात्र दुसरीकडे जे ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक ठाण्यात आहेत ते या घडामोडींनी नाराज झाले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

गेल्या जवळपास दीड दशकापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व आहे. फक्त महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदच नाही, तर पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे स्वतः उतरत होते, त्यामुळे सध्या जिल्ह्यातील बहुतांशी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे शिवसेनेपासून दूर गेले असल्याचे उघड झाले असल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शिंदे समर्थक उघडपणे वेगळी भूमिका घेणार हे उघड आहे.

सध्या ठाणे शहरात शिंदे समर्थकांनी त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि शिवसेना युवासेना विस्तारक राहुल लोंढे हे उघडपणे शिंदे यांचे समर्थन करत असल्यामुळे त्या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सामनातून जाहीर करण्यात आले आहे, तर दुसरीकडे आम्हीच आमच्या पदांचे राजीनामे दिले असल्याचा दावा म्हस्के आणि लोंढे यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने अद्याप तरी कुणी उघडपणे समोर आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला आणि कल्याणमधील काही निष्ठावंत शिवसैनिकांनी शिंदेविरोधी भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in