
भिवंडी : भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु कासीम आझमी हे मंगळवारी भिवंडी महापालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हिंदी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र, मराठी माध्यमांनी मराठीत प्रतिक्रिया मागितल्यावर आझमी यांनी हिंदीतच तिखट उत्तर दिले.
आझमी म्हणाले, “मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण मराठीची आवश्यकता काय आहे? हे भिवंडी आहे. जर ही प्रतिक्रिया दिल्ली वा उत्तर प्रदेशात गेली, तर कोणाला समजणार आहे?” अशी भूमिका त्यांनी मांडली. या वक्तव्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
यावर मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी आझमींना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अबू आझमी, तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करत आहात. मग महाराष्ट्रात बोलताना तुम्हाला यूपीतील भैय्यांची एवढी काळजी का? भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात फक्त मराठीच चालेल. जर मराठी बोलायला लाज वाटत असेल, तर तुम्हाला आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला.