ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला गती; त्रिपक्षीय करारास राज्य शासनाची मान्यता

वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली अशा ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो मार्गाला राज्य शासनाकडून गती मिळाली आहे.
ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला गती; त्रिपक्षीय करारास राज्य शासनाची मान्यता
Published on

ठाणे : वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली अशा ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो मार्गाला राज्य शासनाकडून गती मिळाली आहे. तब्बल १२ हजार ५०० कोटींचा प्रकल्प असलेल्या या मेट्रोला केंद्र सरकारकडून यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. आता राज्य शासनाकडूनही केंद्र, राज्य आणि महामेट्रो अशा त्रिस्तरीय करारनामा करण्यास मान्यता मिळाली असल्याने अंतर्गत मेट्रोसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

एमएमआरडीएच्या वतीने वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली आणि पुढे गायमुख या मुख्य मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात अंतर्गत मेट्रोची आखणी करण्यात आली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र अंतर्गत मेट्रो हा अधिक खर्चिक असल्याचे सांगत केंद्राने अंतर्गत मेट्रो ऐवजी एलआरटी प्रकल्प राबवण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला केल्या होत्या. वर्तुळाकार मेट्रो हा प्रकल्प १३ हजार कोटींचा होता, तर एलआरटी प्रकल्पाचा खर्च हा ७ हजार १६५ कोटींच्या घरात होता. त्यामुळे एलआरटीमुळे सुमारे ५ हजार कोटींची बचत होणार होती. तसा प्रस्तावही पालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता एलआरटी प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत मत केंद्राने नोंदवल्याने केंद्राच्या सूचनेनंतर पुन्हा अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर केंद्रानेही अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे. आता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य आणि महामेट्रो यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करावा लागणार असून त्यासाठी महामेट्रोने कराराचा मसुदाही तयार करून तो शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता देऊन त्यासंबंधीच्या अध्यादेश काढला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.

वर्तुळाकार मेट्रोची प्रस्तावित स्थानके

वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी, ठाणे स्टेशन

logo
marathi.freepressjournal.in